Jewelry stolen from woman who died at J.J. Plus Hospital
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मृत्यूशी दोन हात करत असताना जे. जे. प्लस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगावरील सुमारे २ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटने प्रकरणी त्या महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिवनगर, कन्नड तालुक्यातील संदीप मनोहर गायकवाड (३८) यांची आई बिजलाबाई गायकवाड (६३) यांना १३ नोव्हेंबर रोजी श्वसनाचा त्रास झाल्याने जे.जे. प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असून तातडीने आयसीयूमध्ये उपचार सुरू केले.
दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास बिजलाबाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी बिजलाबाईच्या अंगावर असलेली सोन्याची साखळी आणि कानातील वेलसह टॉप्स असे सुमारे २ लाख ४० हजारांचे दागिने होते. पोलिसांचा पंचनामा आणि हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनंतर मृतदेह खाली नेण्यात आला. मात्र, नंतर विजलाबाईच्या अंगावरील दागिने गायब असल्याचे दिसून आले.
सीईओंचे आश्वासन
हॉस्पिटलचे सीईओ डॉ. प्रशांत पाटील यांनी कुटुंबाला सात दिवसांत दागिने परत देऊ असे आश्वासन दिले असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतेही दागिने परत न मिळाल्याने कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांना सहकार्य आमचे काम उपचाराचे चोरी बाबत हॉस्पिटलमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. तपासादरम्यान आहेत, ते आम्ही केले. पोलिस योग्य ती कारवाई करतील. दरम्यान या संदर्भात पोलिसांना जे काही सहकार्य लागणार आहे ते केले जाईल. तसेच दोषींवर कारवाई करावी असे पत्रही हॉस्पिटलच्या वतीने पोलिसांना दिले आहे.- डॉ. जीवन राजपूत
हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांवर संशय
जे.जे. प्लस हॉस्पिटलमधील संकेत गोफणे (हाऊसकीपिंग), सुनीता पाटोळे (नर्सिंग), सुनीता निकम, तरन्नुम अहमद, गणेश धारा, सरला खरात, विलास चोरमारे यांच्यावर गायकवाड यांनी संशय व्यक्त केल्याचे देखील तक्रारीत नमुद केले आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार संतोष मुदीराज करीत आहेत.