पैठण : जायकवाडी धरणाच्यावरील भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक उपलब्ध होत असल्याने, कुठल्याही वेळेत धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हसे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनासह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडी प्रकल्पात रविवारी दुपारपर्यंत ८३.८३ टक्के जिवंत पाणीसाठा (१८१९.८५२ दलघमी) उपलब्ध झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सध्याच्या परिस्थितीत ३२ हजार ८८१ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. वरील धरणातून येणारी पाण्याची आवक लक्षात घेता, जायकवाडी धरणाची २७ पैकी प्रथम ५ दारे कोणत्याही क्षणी उघडण्यात येण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाच्या धरण नियंत्रण पथकाकडून केले जात आहे.
ठण तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या चनकवाडी, पाटेगाव, वडवळी, मायगाव, नायगाव, आपेगाव, नवगाव, तुळजापूर, उंचेगाव, अंबड टाकळीअंबड, हिरडपुरी यासह इतर तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन, नदीपात्रात काही तटस्नान, वाहने किंवा जनावरे असल्यास त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे. पाण्याचा विसर्ग सुरू असताना कुठल्याही नागरिकांनी व लहान मुलांनी पाण्यात उतरू नये, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.