

Leaders follow up on Jayakwadi water issue
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यांत अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून तसेच गोदावरी नदीवरील बॅरेजेसमध्ये तातडीने पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले असून, यासाठी आमदार हिकमत उढाण आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे ऊस, सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिके धोक्यात आली होती. पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांनी माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर राजेश टोपे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक तथा लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता जयंत गवळी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून गोदावरी नदीवरील बॅरेजेस तसेच जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. प्रशासनाने या मागणीची दखल घेत त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, घनसावंगी मतदारसंघातील लाभक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने सिंचनासाठी कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी आमदार हिकमत उढाण यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत आमदार उढाण यांनी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडत तातडीने पाणी सोडण्याची आवश्यकता अधोरेखित केली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेला प्रभावी पाठपुरावा आणि शासनाने घेतलेल्या तातडीच्या निर्णयामुळे अंबड, घनसावंगी व परतूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार उढाण यांच्या पाठपुराव्याला यश
आमदार उढाण यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात तातडीने पाणी सोडण्याचे आदेश दिले. प्रशासनाच्या माहितीनुसार उद्यापासून कालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निर्णयामुळे ऊसासह खरीप पिकांना मोठा आधार मिळणार असून, परिसरातील विहिरी, बोअरवेल तसेच जलस्रोतांचे पुनर्भरण होण्यास मदत होणार आहे.