Manoj Jarange Patil Health Update  Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Jarange health News : उपोषणाने जरांगे यांची प्रकृती खालावली

गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

Jarange's health deteriorated due to the hunger strike

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांना गुरुवारी (दि.१७) दुपारी त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपोषणामुळे त्यांना तीव्र डिहायड्रेशन झाले असून, हायपोग्लायसेमिया, हायपोटेन्शन तसेच इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन आढळून आले आहे.

त्यामुळे त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. विनोद चावरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. डॉ. चावरे म्हणाले, जरांगे यांच्या उपोषणाचा गुरुवारी २०वा दिवस होता. दीर्घकाळ उपोषण केल्याने त्यांच्या शरीरातील पाणी, रक्तातील साखर आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या पातळीवर परिणाम झाला आहे.

सध्या डिहायड्रेशन, हायपोग्लायसेमिया, हायपोटेन्शन पूर्ववत करण्यावर उपचार पथकाचे प्राधान्य आहे. बुधवारी केलेल्या रक्त तपासणी अहवालांमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून आले. आता रुग्णालयात आल्यावर पुन्हा त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यातील अहवालांच्या आधारे पुढील उपचार निश्चित केले जाणार आहेत.

दरम्यान, जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा केली.

त्यानुसार ते मुंबईच्या दिशेने खाना झाले. मात्र, बुधवारी रात्री बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी तेथे मुक्काम केला. गुरुवारी पहाटे सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ देत उपोषण सोडल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT