

Considering Sambhajinagar as an alternative to Pune
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : देशातील आघाडीच्या ऑटोमोबाईल ओईएम कंपन्यांपैकी एका कंपनीच्या टूल अँड डाय विभागासोबत स्थानिक उद्योगांचा संवाद व क्षमता सादरीकरण कार्यक्रम सीएमआयच्या पुढाकाराने पार पडला. यात छत्रपती संभाजीनगरमधील सुमारे ८० ऑटोमोबाईल व अभियांत्रिकी सप्लायर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामुळे कंपनीचे प्रतिनिधी प्रभावित झाल्याने पुण्याला पर्यायी पुरवठादार केंद्र म्हणून संभाजीनगरचा विचार होण्याची शक्यता आहे.
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (सीएमआयए) च्या वतीने आयोजित या संवादाचा मुख्य उद्देश संभाजीनगर परिसरातील उद्योगांच्या उत्पादन क्षमता जाणून घेणे आणि संबंधित अग्रगण्य कंपनीच्या आगामी गरजांसाठी स्थानिक पुरवठादारांच्या संधी निर्माण करणे हा होता. सहभागी उद्योगांनी आपली मशिनरी, उत्पादन क्षमता, तांत्रिक कौशल्य आणि विविध अभियांत्रिकी सेवांची माहिती सादर केली.
संभाजीनगरात उपलब्ध औद्योगिक क्षमता आणि सहभाग पाहता, स्थानिक सक्षम उद्योगांना आगामी प्रकल्पांमध्ये संधी देण्याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींनी सकारात्मक दर्शविली. संबंधित उद्योगांना पुरवठादार म्हणून सहभागी करून घेण्यासाठी कंपनीकडून क्षमता स्व-मूल्यांकन, कागदपत्रांची पडताळणी, गुणवत्ता व उत्पादन क्षमतेचे मूल्यांकन आणि त्यानंतर विक्रेता कोड निर्मितीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
त्यामुळे संबंधित क्षेत्रातील उद्योगांनी सीएमआयकडे कंपनी प्रोफाइल, उत्पादन क्षमता आणि प्रमुख कौशल्य क्षेत्रांसह आवश्यक माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमासाठी सीएमआयएचे अध्यक्ष अथर्वेशराज नंदावत, मानद सचिव अजिंक्य सावे तसेच ऋषिकेश जाजू, सौरभ छल्लानी आणि ऋषिकेश गवळी यांनी समन्वय व सहभाग घेतला.
स्थानिक उद्योगांना संधी
या बैठकीमुळे संभाजीनगरच्या ऑटोमोबाईल, टूलिंग, ऑटोमेशन आणि अभियांत्रिकी क्षेत्राला मोठ्या ओईएमच्या पुरवठा साखळीत सहभागी होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. स्थानिक उद्योगांना मिळणाऱ्या संभाव्य व्यवसाय संधींमुळे परिसरातील औद्योगिक विकासाला तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, असे मत सीएमआयएचे अध्यक्ष अथर्वेशराज नंदावत यांनी व्यक्त केले.