Jal samadhi protest gangapur farmer
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा: गंगापूर तालुक्यातील अमळनेर परिसरात रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी व कलमीच्या ओढ्यात उंच कठड्याचा पूल करावा या मागणीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.५) सकाळी कळमी नाल्याच्या पाण्यात उतरून सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
गंगापूर शहराच्या मुख्यालयापासून नवीन कायगाव पुढे छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गापासून अमळनेर मार्गे जुने लखमापूर येथे जाणाऱ्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या डांबरीकरण रस्त्यालगत काही नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वर्दळीच्या रस्त्याने जड वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
ऊस वाहतूक वाहन, कांदा लोडिंग किंवा इतर मोठी वाहने तेथून चालवण्यास अडचण येत आहे. दोन गावच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उपयुक्त असलेला हा रास्ता सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. लाखो रुपये खर्चुन बनविण्यात आलेला रस्ता उपयोगात येत नसल्याने वाहनधारक शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. आंदोलकांच्या समस्या प्रश्न समजून घेण्यासाठी घटनास्थळी जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता एस. बी. अकुलवार पोहचले.
त्यांनी लोकांशी संवाद साधून मार्ग काढण्याबाबत आश्वासन दिले. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांनी १५ दिवसांत रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येईल असे लेखी पत्र आंदोलकांना दिले. त्यानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनस्थळी पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे, कायगाव बिटचे पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय पाखरे, गोपनीय वार्ताचे मनोज नवले, रिझवान शेख.
अमित पाटील, गणेश जाधव आदींनी बंदोबस्त ठेवला. तर मंडळ अधिकारी मीना सुक्ते, ग्राम महसूल अधिकारी पल्लवी लोणे, ग्रामपंचायत अधिकारी आर.डी. उंडे, कायगावच्या समुदाय आरोग्य अधिकारी शिल्पा लोंढे, आरोग्य सेवक बापूराव कापसे, आशा स्वयंसेविका ताराबाई शिंदे व रुग्णवाहिका चालक आरोग्य सेवेसाठी हजर होते. या आंदोलनात जनार्दन मिसाळ, सुखदेव भणगे, खंडेराव गवारे, इसाभाई पठाण, रामेश्वर मिसाळ, राधेश्याम कोल्हे, यमाजी जवादे, लवकुश कर्जुले, जगन्नाथ पंडित, सुरेश मिसाळ, मंगेश भणगे, गणेश मिसाळ, बाबासाहेब जवादे, शिवाजी दुबे, दत्तू पंडित, रामेश्वर पंडित, अशोक मोरे, सोमनाथ सोनवणे, भाऊसाहेब पंडित, भावराव मिसाळ आदी ग्रामस्थ सहभागी होते.