

18 devotees of Sambhajinagar are safe
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
दर्शनासाठी गेलेले जिल्ह्यातील १८ भाविक कालपासून उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. त्यांच्यासोबत संपर्क होत नसल्याने नातेवाईकांसह जिल्हा प्रशासनाची झोप उडाली होती. मात्र, बुधवारी सायंकाळी या भाविकांशी संपर्क झाला असून सर्व सुखरूप आहे. त्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी ढगफुटी होऊन महापूर आला. यात शेकडो जण वाहून गेले. परिणामी, येथे असंख्य भाविक तेथे अडकून पडले असून यात छत्रपती संभाजीनगरातील १८ भाविकांचाही समावेश होता. नातेवाईकांनी वारंवार प्रयत्न करूनही त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. नातेवाईकांबरोबरच जिल्हा प्रशासनही या भाविकांचा शोध घेत होते. त्यासाठी मंत्रालय, उत्तरकाशी जिल्हा प्रशासन आदींसोबत माहितीची देवाण-घेवाण करण्यात येत होती.
सलग चोवीस तास संपर्क न झाल्याने प्रशासनही चिंतेत होते. परंतु सायंकाळी या भाविकांनी स्वतः फोन करून आपण सुखरूप असल्याची माहिती नातेवाईकांना कळविली. नातेवाईकांनी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांना त्याबाबत कळविले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. हे सर्व जण ३१ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथून दिल्लीमार्गे उत्तराखंडला गेले होते.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविकांमध्ये उज्ज्वला बोर्डे, अरुण बोर्डे, ज्योती बोर्डे, भारती कुपटकर, प्रमिला दहिवाळ, शिवाजी दहिवाळ, शुभांगी शहाणे, किरण शहाणे, मंजू नागरे, संतोष कुपटकर, नूतन कुपटकर, शिवदत्ता शहाणे, उषा नागरे, कल्पना बनसोड, नवज्योत थोरहत्ते, वेदांत थोरहत्ते, शीतल थोरहत्ते, कृष्णा थोरहत्ते यांचा यात समावेश आहे.