Is the general public suffering from the tax collection of the Municipal Corporation, but businessmen are safe?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या कर वसुली प्रक्रियेत गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप करत सातारा परिसरातील नागरिकांनी आयुक्त व महापौरांकडे निवेदन सादर केले आहे. सामान्य नागरिकांकडून काटेकोर कर वसुली केली जात असून, व्यावसायिक मालमत्तांना मात्र अभय दिले जात असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात आला आहे. वसुली मोहिमेदरम्यान काही अधिकारी-कर्मचारी या मालमत्ताधारकांकडून दरमहा तसेच आर्थिक वर्षाअखेर रोख स्वरूपात पैसे घेत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या निवेदनात नमूद आहे की, महापालिकेकडून सातारा परिसरातील सुमारे ३०० व्यावसायिक मालमत्तांवर अद्याप अधिकृत कर लावण्यात आलेला नाही. तसेच कर वसुली मोहिमेदरम्यान काही अधिकारी-कर्मचारी या मालमत्ताधारकांकडून दरमहा व आर्थिक वर्षाअखेर रोख स्वरूपात पैसे घेत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
मात्र या व्यवहारांची नोंद अधिकृत कर व्यवस्थेत होत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांच्या मते, मालमत्तांचे स्वरूप चुकीचे दाखवणे, व्यावसायिक वापराचे क्षेत्रफळ कमी दाखवणे अशा पद्धतीने शासनाचा महसूल कमी केला जात आहे.
त्यामुळे महापालिकेला दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच एखादा नागरिक स्वतःहून कर भरण्यासाठी गेला तरी गरज नाही, असे सांगून प्रकरण मिटवले जाते, तर तक्रारी आल्यावरही सेटलमेंट केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांकडून या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.