Is the administration turning a blind eye to encroachments by those in power?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाकडून कारवाईची मोहीम सुरू असताना चिश्तिया चौकातील भाजप नगरसेवकाच्या बांधकामाबाबत मात्र प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांनी केला आहे. संबंधित बांधकामाची स्थळ पाहणी करून परवानगीची शहानिशा करण्याची मागणी करत प्रशासनाला तब्बल चार स्मरणपत्रे देण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने सत्ताधारी नगरसेवकाच्या अतिक्रमणाला प्रशासनाकडून अभय दिले जात आहे का, असा सवाल साजिद यांनी उपस्थित केला आहे.
सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून छोट्या संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजी व्यावसायिकांसाठी शॉप लेट प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे. या भूखंडांवर केवळ तळमजल्याचे बांधकाम करण्यास परवानगी दिली जाते. मात्र, शहरातील अनेक भूखंडांवर परवानगीच्या मर्यादपेक्षा अधिक दोन ते तीन मजली बांधकामे उभारण्यात आल्याचा दावा साजिद यांनी केला आहे.
तसेच चिश्तिया चौकातील भाजपच्या एका नगरसेवकाने केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित नगरसेवकाने आपले अनधिकृत बांधकाम काढून घेतले. मात्र, तळमजल्यावरील बांधकामही मंजूर परवानगी आणि नियमानुसारच आहे का, याची अद्याप खातरजमा झालेली नाही, असा आरोप साजिद यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. तळमजल्यावरील बांधकाम मंजूर नकाशानुसार आहे की त्यात अतिरिक्त बांधकाम करण्यात आले.
आहे, याची तपासणी करावी, अशी मागणी साजिद यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात प्रशासनाकडे पहिल्यांदा १८ मे रोजी निवेदन देण्यात आले. त्यानंतर २२ जून, ८ जुलै आणि १० ऑगस्ट रोजी पाठपुरावा करीत स्वतंत्र स्मरणपत्रे देण्यात आली. चार वेळा स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाने अद्याप स्थळ पाहणी करून कारवाई केलेली नसल्याचा आरोप साजिद यांनी केला.
महापालिकेकडून सर्वसामान्यांवर कारवाई
महापालिका प्रशासनाकडून शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात असताना सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या बांधकामाबाबत मात्र कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित बांधकामाची निष्पक्षपणे तपासणी करून परवानगीपेक्षा अधिक बांधकाम आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेत्यांनी चार स्मरणपत्रे देऊनही कारवाई न झाल्याने या प्रकरणाकडे महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहणार का, याकडे आता मनपा वर्तुळाचे लक्ष लागले आहे.