Investigation into bogus call center case delayed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा अद्याप : पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या कॉल सेंटर प्रकरणाचा तपास रेंगाळल्याचे चित्र आहे. सात दिवस उलटले तरी कोणत्या अमेरिकन नागरिकाची, किती रकमेची फसवणूक झाली हे उघड झालेले नाही. याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, कॉल सेंटर रॅकेटला फंडिंग करणाऱ्या राजवीर शर्मा (२२) याला घेऊन एक शनिवारी गुजरातच्या अहमदाबादला गेले होते.
मात्र हे पथकही रिकाम्या हातानेच परतल्याचे सूत्रांनी सांगितले. राजवीरचा काका बलवीर वर्मा ऊर्फ पाजी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पथक अधिक माहितीनुसार, एमआयडीसी सिडको पोलिसांनी २८ ऑक्टोबरच्या रात्री चिकलठाणा एमआयडीसी येथील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. कारवाईत सुमारे ११५ आरोपींना अटक केली.
सुरुवातीला मास्टरमाइंड म्हणून अब्दुल फारूख मुकदम शाह ऊर्फ फारूखी याच्यासह भावेश प्रकाश चौधरी (३४, रा. अहमदाबाद), भाविक शिवदेव पटेल (२७, रा. मुंबई), सतीश शंकर लाडे (३५, रा. अहमदाबाद), वलय पराग व्यास (३३, रा. अहमदाबाद), अजय ठाकूर, मनोवर्धन चौधरी यांची पोलिस कोठडी घेऊन तपास सुरू केला. तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले.
कोट्यवधींची फंडिंग करणारा गुजरातचा बलवीर वर्मा ऊर्फ पाजी असल्याचे समोर आले. बलवीरचा पुतण्या राजवीरला न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेऊन पुन्हा तपास सुरू केला. दुसरीकडे अमेरिकन तपास संस्था एफबीआयकडून अमेरिकन लोकांची माहिती मागविल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्याचे पुढे काय झाले, हेही अद्याप समोर आलेले नाही.
पोलिस म्हणतात काहीच अपडेट नाही
पोलिसांकडून सोमवारी दिवसभर माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. रात्री उशिरा तपासात काहीही अपडेट नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे थेट आंतरराष्ट्रीय पातळीवरील फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास संथगतीने सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला पोलिस महासंचालक कार्यालयातून तपासावर लक्ष ठेवण्यात येत होते. अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी आरोपींची कसून चौकशी करताना दिसले होते.