

60,000 duplicate names in voter lists?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे असल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत गंगापूर, पैठण आणि फुलंब्री या तीन विधानसभा मतदारसंघातील सुमारे ६० हजार नावांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी संबंधित मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या असून, सध्या त्याची पडताळणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपरिषद व नगरपंचायतींची प्रभाग रचना अंतिम केली आहे.
सध्याच्या मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे असल्याचे आरोप होत आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनकाडे लेखी स्वरूपात तक्रारीही दाखल झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत तीन तक्रार अर्ज सादर झालेले असून, त्यासोबत मतदारांची नावेही जोडण्यात आली आहेत.
पैठण विधानसभा मतदारसंघात २५ हजार दुबार नावे असल्याची पहिली तक्रार आहे. दुसरी तक्रार गंगापूर विधानसभा मतदारसंघातील नावांबाबत असून, तिथे तब्बल ३६ हजार नावे दोन दोन वेळा असल्याचे म्हटले आहे. तर फुलंब्री विधानसभा मतदारसंघातही २२०० दुबार नावे असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या तिन्ही तक्रारी मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या असून, त्यांना पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता घरोघरी जाऊन बीएलओंकडून ही पडताळणी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विविध राजकीय पक्षांकडून आक्षेप
नगरपरिषदेची आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. मात्र आता या निवडणुकांसाठी ग्राह्य धरल्या जाणाऱ्या मतदार याद्यांवर विविध राजकीय पक्षांकडून आक्षेप घेण्यात आले आहेत.