Insurance compensation of Rs 1 crore approved for the family of deceased employee Amol Jadhav
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मुकुंदवाडी येथील अनधिकृत होर्डिंग काढताना विजेचा धक्का (शॉक) लागून मृत्यू झालेले मनपाचे स्वच्छता कर्मचारी अमोल जाधव यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे. महापालिकेने आपल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसाठी १ कोटी १५ लाख रुपयांचा विमा उतरवला होता. त्यापैकी १ कोटी रुपयांच्या विम्याला विमा कंपनीने मंजुरी दिली आहे.
यासोबतच, आरोग्य विभागाचे कर्मचारी राहुल चव्हाण यांचाही अपघाती मृत्यू झाला होता. त्यांनाही १ कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या विम्यामुळे दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
दरम्यान, अमोल जाधव यांच्या दुर्घटनेनंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत होर्डिंगधारकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली होती. मात्र, काही दिवसांनंतर ही मोहीम थंडावली असल्याचे चित्र आहे. अनधिकृत होर्डिंगची मोहीम सातत्याने राबवली तरच शहरात बेकायदा होर्डिंग लागणे बंद होईल आणि शहराचे विद्रुपीकरण थांबेल, अशी चर्चा आता नागरिक आणि पालिका वर्तुळात रंगू लागली आहे.