In a land deal, a businessman was defrauded of ₹1.90 crore by his own friend
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे आमिष दाखवून सिल्लोडच्या अडत व्यापाऱ्याची १ कोटी ९० लाख २५ हजार ४०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार २४ मे २०२४ ते २४ एप्रिल २०२५ या काळात दिल्लीगेट भागात घडला. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांसह त्यांच्या वॉचमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौसिया वेगम शेख शफिक, शेख इरफान अजहर शेख शफिक, शेख शफिक शेख हबीब (सर्व रा. दिल्लीगेट) आणि वॉचमन शेख जमील शेख रसूल (रा. हिमायतनगर) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
सिल्लोड येथील रहिवासी आणि एस.आय. ट्रेडर्सचे मालक शेख इम्रान शेख अहेमद शरीफ (३७) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे मित्र आरोपी शेख इरफान याने हिमायतनगर येथील गट क्रमांक १९/१ मधील जमिनीचा मालक मोहसीन खान सोबत २ कोटींमध्ये खरेदीचा सौदा झाल्याचे सांगून गुंतवणुकीसाठी २५ लाख रुपये कमी पडत असल्याचे सांगितले होते.
ही जमीन प्लॉटिंग पाडून विक्री करणार आहे. जमीन वॉचमन शेख जमीलच्या नावे घेणार असल्याचेही त्याने सांगितले होते. मित्र असल्याने विश्वास ठेवून शेख इम्रान यांनी वेळ ोवेळी आरटीजीएस आणि फोन-पेद्वारे पैसे दिले. इरफान याने फिर्यादीला हिमायतनगर येथील प्लॉट क्र. ९० आणि ९१ विकण्याचे ठरवून १ कोटी ४५ लाख ८६ हजार रुपये रोख स्वरूपात घेतले होते.
मात्र तांत्रिक अडचणींचे कारण सांगून प्लॉटची रजिस्ट्री टाळली. त्यानंतर विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी जोगवाडा येथील १६ एकर २९ गुंठे जमिनीचे कुलमुखत्यारपत्र फिर्यादीच्या नावे करून दिले. मात्र शेख इम्रान यांनी जेव्हा तलाठी कार्यालयात चौकशी केली, तेव्हा त्यांना ही जमीन आरोपींनी यापूर्वीच दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली असल्याचे कळले.
आरोपींनी संगनमताने खोटे आणि बनावट नोंदणीकृत जीपीए तयार करून फिर्यादीची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी संगनमताने खोटे आणि बनावट नोंदणीकृत जी.पी.ए. तयार करून आपली मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे शेख इम्रान यांनी तक्रारीत म्हटले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
व्यापाऱ्यासह अनेकांना गंडा
मित्राच्या शब्दावर विश्वास ठेवून शेख इम्रान यांनी २४ आणि २५ मे २०२४ रोजी एकूण २० लाख आरटीजीएसद्वारे पाठवले. त्यानंतर आर-ोपींनी प्लॉटिंग विक्री सुरू केल्याचे काही दिवसांनी कळले. पैसे मागण्यास गेल्यानंतर आरोपींनी त्यांना तांत्रिक कारण सांगून टाळाटाळ केली. हिमायतनगर येथील ले-आऊटमधील प्लॉट क्रमांक ९० आणि ९१ हे दोन प्लॉट २ कोटी रुपयांत देण्याचे ठरवले. यासाठी फिर्यादीने वेळोवेळी रोख स्वरूपात १ कोटी ४५ लाख ८६ हजार रुपये आणि फोन पे तसेच एनईएफटीद्वारे उर्वरित रक्कम असे एकूण १ कोटी ९० लाख २५ हजार ४०० रुपये आरोपींना दिले. मात्र त्यांची फसवणूक झाली. इम्रान यांनी प्लॉट शेजारच्या लोकांना विचारणा केल्यानंतर इरफानने बऱ्याच लोकांकडून पैसे घेऊन त्यांनाही गंडा घातल्याचे समोर आले.