दुर्लक्ष समजू नका, अवैध धंदे, कुठे सुरू सर्व माहिती : शिरसाट  File Photo
छत्रपती संभाजीनगर

दुर्लक्ष समजू नका, अवैध धंदे, कुठे सुरू सर्व माहिती : शिरसाट

नेत्यांसह नगारिकांचे शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांवर ताशेरे

पुढारी वृत्तसेवा

Illegal businesses, all information about where they are operating : Shirsat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात कुठे दारूचे अड्डे, बटन, गांजा, चरस मिळतो याची यादीच माझ्याकडे आहे. पोलिसांनो दुर्लक्ष समजू नका आणि सार्वजनिक ठिकाणी बोलायला लावू नका. महिन्याला किती गांजा, चरस किती विक्री होतो, कोणते अड्डे कुठे लगेच सांगतो म्हणत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांना खुले आव्हानच दिले.

पालकमंत्र्यांनीच पोलिसांचे वाभाडे काढल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे. रविवारी (दि.२४) सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे एमआयटी कॉलेजच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिरसाट बोलत होते.

बैठकीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. डॉ. कल्याण काळे, आ. प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, पृथ्वीराज पवार, डीसीपी रत्नाकर नवले, पंकज अतुलकर, प्रशांत स्वामी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, रशीद मामू यांच्यासह सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, विविध पक्षांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट पुढे म्हणाले की, सर्वकाही आलबेल आहे, असे पोलिसांनी समजू नये. एका ठिकाणी ७०-७० दारूचे अड्डे आहेत. त्याची यादी माझ्याकडे आहे. ही वस्तुस्थिती आहे, बरोबर ना अंबादास (दानवेंना उद्देशून). पुढे ते म्हणाले, शहरात किती गांजा, चरस विकल्या जातो याचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. कोण कुठे विक्रीसाठी बसतात हेही मला माहिती आहे. अगोदर कारवाई करा. शहर बदनाम होऊ देऊ नका. सर्वसामान्य माणसाला धोका आहे. शंका असेल तर कोणता अड्डा कुठे लगेच सांगतो, असे आव्हानच शिरसाट यांनी जाहीर भाषणात दिले. बटनचा विळखा शहराला पडलाय. यंदाच्या गणेशोत्सवात एका जरी माय बहिणीला हात लावला तर लक्षात ठेवा

कुठे अवैध धंदे पोलिसांना सर्व माहिती : डॉ. कल्याण काळे

शहरात बटन विक्रीचे प्रकार वाढले आहेत. नशेखोरीतून भोसका-भोसकी, खून, हाणामारीचे प्रकारही वाढले आहेत. कुठे नशेचे, अवैध दारूचे अड्डे पोलिसांना सर्व माहिती आहे. पोलिसांनी ठरविले तर ते कायमचे बंद करू शकतात, पण तसे होताना दिसत नसल्याची खंत खा. डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केली.

रात्री दुचाकींची तपासणी करा : आ. जैस्वाल

शहरात दारुडे, चरस, गांजाचे सेवन करून महिलांची छेड काढतात. त्यांचे फोटो काढतात. अशा नशेखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांना दिल्या. रात्री दहा वाजेनंतर शहरात दुचाकींची तपासणी सुरू करा, तुमचे अर्धे काम होऊन जाईल. अनेक जण चाकू लावून फिरतात त्यावर लक्ष देण्याची मागणी आ. प्रदीप जैस्वाल यांनी पोलिसांकडे केली.

खुनापर्यंत मजल, पोलिस दबावाखाली ? : अंबादास दानवे

गणेशोत्सवात जागेवरून सिडको एन-६ येथे खुनाची घटना घडली. पोलिसांकडे ११ वेळा तक्रारी दिल्या, तरीही पोलिसांनी काहीच केले नाही. पोलिस कोणाच्या दबावाखाली कारवाई करत नाहीत हे बघितले पाहिजे, असे अनेक प्रकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडतात. जिथे सत्ताधारी पक्षातील मंडळींचा हस्तक्षेप असतो, असा आरोप विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केला. दरम्यान, डीजेमुक्त संभाजीनगर होण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT