Husbands who have been abused by their wives celebrate Pipal Purnima in Karodi
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
वटपौर्णिमाच्या एक दिवस आधी पत्नी पीडित पुरुषांनी सोमवारी (दि.९) करोडी येथील पत्नी पीडित आश्रमात पिंपळाच्या (मुंजा) झाडाला १०८ उलट्या फेऱ्या मारून पिंपळ पोर्णिमा साजरी केली.
करोडी येथे ड. भरत फुलारे यांनी आठ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पत्नी पीडित आश्रमात देशभरातून जवळपास ११ पत्नी पीडित पुरुषांनी नोंदणी केली आहे. आज सोमवारी या आश्रमात पत्नी पीडित पुरुषांनी येथील पिंपळाच्या झाडाला १०८ उलट्या फेऱ्या मारल्या. यावेळी त्यांनी छळ करणारी बायको नको रे बाबा, उद्या सावित्रीप्रमाणे भांडखोर बायका खोटे-नाटे बोलून वटवृक्षाची पूजा करून सात जन्म हाच पती मिळो, असे साकडे घालतील.
म्हणून उद्या त्यांचे काही एक म्हणणे ऐकू नकोस. अशा पत्नी पीडित पुरुषांची त्यांच्या पत्नीपासून सुटका कर, असे साकडे घातले. तसेच त्यांनी राज्यामध्ये पुरुष राज्य आयोगाची स्थापना करण्यात यावी, प्रत्येक पोलिस ठाण्यात पुरुष दक्षता समिती तसेच जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात यावे, पोलिस स्टेशनमध्ये लाईव्ह डिटेक्टर बसविण्यात यावे, कौटुंबिक वाद लॉ प्लिमीटेशनच्या अंतर्गत आले पाहिजे म्हणजे एका वर्षाभरात सुरू झाल्यास पाच वर्षांच्या आत तो निकाली काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी पत्नी पीडित आश्रमाचे संस्थापक ड. भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, श्रीराम तांगडे, संजय भांड, वैभव घोळवे, दिनेश दुधाट, उमेश दुधाट आदींची उपस्थिती होती.
कौटुंबिक गुन्ह्यांमध्ये जास्त करून पुरुषांना दोषी ठरविण्याची मानसिकता समाजात रुजली आहे. सुप्रीम कोर्टाने २०२३ मध्ये ४९८ (ए) कायद्याचा गैरवापर थांबविण्याचे निर्देश दिले असले तरी पोलिस यंत्रणा अजूनही महिलांच्या एकतर्फी आरोपवावरून पुरुषांना अटक करत असतात. पोटगी प्रकरणामध्ये अनेक पुरुष स्वतःचे घर, नोकरी प्रतिष्ठा गमावत आहे. नवी दिल्लीतील एन-सीआरबी रिपोर्ट २०२४ नुसार २०२३ मध्ये १ लाख २० हजार विवाहित पुरुषांनी आत्महत्या केली आहे. जी महिला आत्महत्या संख्येपेक्षा ३ पट अधिक आहे.डॉ. भारत फुलारे, संस्थापक, पत्नी पीडित आश्रम