Husband murdered by lover with the help of a friend
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने खून करीत कायमाचा काटा काढला. ही घटना बुधवारी (दि.२९) दुपारी भोकरदन रस्त्यावरील नगरपरिषदच्या पाण्याची टाकीच्या संरक्षक भिंतीजवळ उघडकीस आली होती. या घटनेचा शहर, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करीत अखेर गूढ उकलले व रविवारी (दि.२) पत्नीसह तिघांना गजाआड केले.
अशोक ग्यानसिंग मीना (४०, रा. भोकाणवाडी, जि. खंडवा, मध्य प्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी प्रियकर रियाज शहा खालेद शहा (३८, रा. आलापूर, ता. भोकरदन, ह. मु. मक्रणपूर, ता. कन्नड), कौशल्याबाई अशोक मीना (बैनाडे, ३५, रा. वेरूळ, ता. खुलताबाद), आकाश आत्माराम इंगळे (३२, रा. जांभूळ, ता. जामनेर) असे गजाआड केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अशोक मीना व कौशल्याबाई यांचे २१ वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. दोघे पती-पत्नी वेरूळला शेतातील अद्रक काढण्याचे (मजुरी) काम करीत होते. आरोपी रियाज शेख हा अद्रकचा व्यवसाय करीत होता. यादरम्यान मृताची पत्नी व रियाज शहा यांच्यात ओळख झाली. पुढे ओळखीतून रियाजचे मृताच्या पत्नीशी सूत जुळले. ही बाब मृताच्या लक्षात आल्याने तो पत्नीला गावी (मध्य प्रदेश) चालण्याचा आग्रह करीत होता. यामुळे रियाज, प्रेयसी पत्नीने मृताचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले.
बुधवारी (दि. २९) रियाजने आरोपी मित्राला सोबत घेऊन अशोक मीनाला काम लावून देतो म्हणत सिल्लोडला आणले. काही वेळ दोघे आरोपी अशोकला सिल्लोड शहरात घेऊन फिरले. त्यानंतर दुपारी भोकरदन रस्त्यावरील नगरपरिषदेच्या पाण्याची टाकीच्या संरक्षक भिंतीजवळ आरोपींनी अशोक मीनाचा कटरने गळा चिरला व डोक्यात दगड टाकून पसार झाले.
या खुनाचे गूढ उकळण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. हातावर मीना (एके) असे गोंदलेले असल्याने मृत व्यक्ती परराज्यातील असावा, असा कयास लावत शहर, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास सूर केला. पाच दिवसांत गोपनीय व तांत्रिक बाबी तपासात पोलिसांनी या खुनाचे गूढ उकलत तिघांना गजाआड केले. दरम्यान, मृत व्यक्ती व आरोपी पत्नीला एक मुलगा, दोन मुली असल्याचे कळते.
शहर, गुन्हे शाखेची कामगिरी
पाच दिवस शहर व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अनेक तांत्रिक बाबी तपासल्या. तर गुन्हे शाखेचे पोलिस शहरात तळ ठोकून होते. अखेर पोलिसांना या खुनाचा छडा लावण्यात यश आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजित कोईगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, विजयसिंह राजपूत, उपनिरीक्षक लहू घोडे, शहर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भिंगारे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे व शहर, गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.