Husband drugged wife and handed her over to his friend
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या पत्नीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करण्यासाठी तिला मित्राच्या हवाली करणाऱ्या एका नराधम पतीचा धक्कादायक प्रताप उघडकीस आला आहे. या प्रकरणी मित्राने बलात्कार करत अश्लील व्हिडिओ काढले आणि नंतर दिरानेही मित्राच्या मदतीने महिलेवर वारंवार अत्याचार केले. या संतापजनक घटनेप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि दीर यांच्यासह एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती (२६), दीर (२७), सासू, सासरे (रा. रोशन गेट), पतीचा मामा (४६, रा. चिकलठाणा), पतीचा मित्र रिजवान (२६, रा. जिन्सी), समीर (२८, रा. कौसर पार्क) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती याने नोट्स लिहिण्याच्या बहाण्याने त्याचा मित्र रिजवान याला पत्नीचा मोबाईल नंबर दिला होता. त्यानंतर रिजवान वारंवार फोन करून 'तू मला खूप आवडतेस, माझ्याशी बोल', असे म्हणत त्रास देऊ लागला. महिलेने ही बाब पती आणि सासू-सासऱ्यांना सांगितली, मात्र त्यांनी 'रिजवान चांगला मुलगा आहे', असे म्हणत त्यालाच पाठीशी घातले.
त्यानंतर ६ एप्रिल २०२५ रोजी पतीने महिलेला संजय नगर भागात नेऊन एका कोल्ड्रिकमधून गुंगीचे औषध पाजले. महिलेला चक्कर आणि उलट्या होऊ लागल्यावर पतीने 'मला अर्जट काम आहे' असा बहाणा करत मित्र रिजवान याला बोलावून घेतले आणि पत्नीला त्याच्यासोबत सोडत निघून गेला
हॉटेलात नेऊन अत्याचार
गुंगीचा फायदा घेत आरोपी रिजवानने तिला राहुल रेजन्सी हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. शुद्धीवर आल्यावर त्याने महिलेला सांगितले की, 'तुझ्या नवऱ्यानेच तुला माझ्याकडे पाठवले आहे आणि शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले आहे'. तसेच या कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ काढून इन्स्टाग्राम व नातेवाइकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
दिराचाही अत्याचार
एप्रिल २०२५ मध्ये महिलेने हा सर्व प्रकार दिराला सांगितला. मात्र, त्यानेही मदत करण्याऐवजी महिलेला कौसर पार्क येथील समीर याच्या घरी नेले आणि जबरदस्तीने गोळ्या खाऊ घालत दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. याशिवाय पतीचा मामा यानेही महिलेला अश्लील शिवीगाळ केली.
हे सर्व असेच चालू ठेव, अशी धमकी
व्हिडिओ व्हायरल होण्याच्या आणि बदनामीच्या भीतीने महिला सुरुवातीला गप्प होती. मात्र पती आणि सासू-सासऱ्यांनी 'हे सर्व असेच चालू ठेव, नाही तर तुला आणि तुझ्या आई-वडिलांना व भावांना मारून टाकू', अशी धमकी दिली. अखेर अत्याचाराला कंटाळून महिलेने आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला आणि जवाहरनगर ठाणे गाठून तक्रार दिली. तपास महिला उपनिरीक्षक पाटील करत आहेत.