High-speed truck hits pickup; two dead, one critical
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड-भोकरदन रस्त्यावर भरधाव हायवाने समोरून येणाऱ्या पिकअपला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा भीषण अपघात शनिवारी (दि.११) रात्री ११ वाजेच्या सुमारास पिंप्री फाट्याजवळ घडला.
या अपघातात विवेक रेवनाथ जेठे (२८, रा. टाकळी ता. सिल्लोड) आणि योगेश गजानन सोनवणे (२८, रा. जळगाव सपकाळ ता. भोकरदन) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. पवन गायकवाड (२७, रा. सराटी ता. फुलंब्री) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. योगेश सोन वणे, विवेक जेठे आणि पवन गायकवाड हे तिघे काही सामान खरेदीसाठी सिल्लोडहून भोकरदनाकडे पिकअपने (एम एच २० एल ५३५९) ने जात होते. भोकरदनकडून भरधाव वेगात येणाऱ्या हायवाने (एम एच १७ वी वाय ०००४) पिकअपला समोरासमोर जोराची धडक दिली.
धडकेनंतर पिकअपचा अक्षरशः चुराडा झाला असून दोघे तरुण वाहनात अडकले होते. नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून विवेक जेठे व योगेश सोनवणे या दोघांना मृत घोषित केले. पवन गायकवाड या स उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात हायवा चालकाच्या विरोधात गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, कर्मचारी पंडित फुले, दीपक इंगळे, दीपक पाटील तसेच ग्रामस्थ समाधान शिरसाठ, श्रीरंग गाडेकर, कृष्णा शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना बाहेर काढले. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले.