

Dudhad Gram Panchayat ranked number one in the district in cleanliness
करमाड, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील दुघड ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२४-२५ अंतर्गत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीने ग्रामपंचायतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ग्रामपंचायतीने गेल्या तीन वर्षांत विविध स्तरांवर ६ वेळेस पारितोषिके पटकावली आहेत.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात, ग्रामपंचायतीने आतापर्यंत वर्ष २०२२-२३ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत मराठवाडा विभागातून व जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक, सन २०२३-२४ मध्ये आर. आर. आबा स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातून व तालुक्यातून प्रथम, तसेच याचवर्षी संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातून तृतीय क्रमांक, सन २०२४-२५ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या वर्षात ग्रामपंचायतीची वसुली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून करण्यात आली.
जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी झाडे लावा प्रादेज अंकित, गटविकास अधिकारी मौना रावतळे, स्वच्छ भारत कक्षाच्या वैशाल जगताप, सत्यजित देशमुख, अमोल खंडाळे, संजय वाघ यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले. हे अभियान यशस्वी करण्याकरिता सरपंच गंगासागर चौधरी, उपसरपंच बळीराम बोर्डे, ग्रामपंचायत अधिकारी संतोष मरमट, ग्रा. स. जनाबाई चौधरी, ताराबाई घोडके, सुदाम घोडके, मधुकर बोर्डे, वंदना काकडे, लिलाबाई अहिरे, जिजाबाई अहिरे, रोजगार सेवक शिवाजी बोरडे, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या सदस्य, सर्व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवून उद्दिष्ट पूर्ण केले.
दुधड ग्रामपंचायतीने गेल्या तीन वर्षात विविध स्पर्धामधून सहा पारितोषिके पटकावली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ही ग्रामपंचायत अव्वल ठरली आहे.
भविष्यात ग्रामपंचायतीने राज्यातून प्रथम व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान स्पर्धेत सुद्धा प्रथम पारितोषिक पटकावण्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्यासाठी सर्व दुधड गावकरी मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत. प्रशासनाच्या प्रत्येक आवाहनाला त्याचा कृतीने ग्रामस्थांचा जोरदार प्रतिसाद असतो.