

Crowds gather to see lions, bears at Siddhartha Udyan
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकच्या शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयातून सिद्धार्थ उद्यानात २७ सप्टेंबरला सिंहासह अस्वल, कोल्ह्यांची जोडी आणण्यात आली होती. उद्यानात येताच त्यांना २४ तास देखरेखीत ठेवण्यात आले. त्यानंतर तीन दिवस या प्राण्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र मागील दोन हे आठवड्यांतच प्राणी संभाजीनगराच्या सिद्धार्थ उद्यानातील वातावरणात रमले असून, सिंह आणि अस्वल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.
मराठवाड्यातील एकमेव सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात मागील २० वर्षांपासून सिंहाची जोडीच नव्हती. शेवटची मादी सिंह मरण पावल्यानंतर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून सिद्धार्थ उद्यानला नव्याने वाघ, सिंह, चित्त्याची जोडी आणण्यावर बंदी घालण्यात आली होती. परंतु लवकरच मिटमिटा येथे सुमारे पावणेदोनशे एकरमध्ये झुलॉजिकल पार्क सुरू होणार आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात असल्याने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सिंह, अस्वल आणण्यास परवानगी दिली. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानाला शिवमोग्गातून सिंह, अस्वल उपलब्ध होऊ शकले आहे.
कर्नाटकचे हे प्राणी दोन आठवड्यांतच सिद्धार्थ उद्यानाच्या वातावरणात रमले आहेत. विशेष म्हणजे यातील एकाही प्राण्याने आहार कमी केलेला नाही. नसता नव्या ठिकाणी आल्यावर प्राण्यांमध्ये अन्न त्यागाचा प्रकार दिसतो. परंतु तिन्ही जोड्यांचा आहार पूर्वीप्रमाणेच कायम आहे. दरम्यान, दोन आठवड्यांपासून प्राणिसंग्रहालयात सिंह आणि अस्वल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली असून, यात चिमुकल्यांमध्ये हे प्राणी अकर्षण ठरत आहेत. दिवाळीच्या सुट्यांमध्ये आणखीच गर्दी वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.