Waluj Heavy Rain : वाळूज परिसरात पावसाचा हाहाकार; पिके पाण्यात, घरांचीही पडझड  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Waluj Heavy Rain : वाळूज परिसरात पावसाचा हाहाकार; पिके पाण्यात, घरांचीही पडझड

सरसकट मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Heavy rains in Waluj area; crops submerged, houses collapse

बबन गायकवाड

वाळूज : वाळूजसह परिसरात शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्री परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार केला. मुसळधार झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली उभी पिके पाण्यात गेली. तर अनेक ठिकाणी घराची पडझड झाली. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. पिके हातची गेल्याने तसेच संसारोपयोगी साहित्य भिजल्याने शेतकरी व नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

वाळूज परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी पुन्हा मुसळधार पावसाने वाळूज परिसराला झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. खामनदीलाही पुर आला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तूर, कापूस, उडीद, मका, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेली आहेत. तर ऊस पूर्ण आडवा पडला आहे. नुकसानीच्या पिकांचा पंचनामा करण्याची घोषणा शासनाने केली असली तरी मुळात सद्याचे नुकसान पाहता सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. परंतू प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात मदत केव्हा मिळेल हे येणारा काळच सांगेल.

पावसामुळे नागरी वसाहतीत अनेकांच्या घरात पाणी शिरले. यात संसार उपयोगी साहित्य तसेच अन्नधान्य भिजले गेल आहे. तर अनेकांची घरे पडली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरलयाने अनेक नागरिकांना कुटुंबासह रात्री जागून काढावी लागली. यात पावसात वाळूज येथील आशाबाई मगन जाधव, शेख शामद शेख नुर यांचे घर पडून मोठे नुकसान झाले. लांझी येथेही बाळासाहेब सातपुते यांचे घर पडून मोठे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर पडला आहे. नारायणपुर येथील सिराज रज्जाक, शेख करीम, हमीद शेख, कय्युम हमद शेख, रज्जाक गणी शेख यांच्या घराचेही नुकसान झालें आहे. तलाठी उदय कुलकर्णी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. या वेळी सरपंच नासेर पटेल, पोलीस पाटील ताजू पटेल, मुकार पटेल, कलाम पटेल आदी उपस्थित होते.

वाळूजवाडीत १३ नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांना संपूर्ण रा? जागून काढावी लागल्याची माहीती सर्जेराव भोंड यांनी दिली. शेतीचे पिक पूर्ण पाण्यात भरल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. वाळूज बु. शिवारातील गट क्रंमाक ८० मधील शेतातील मातीचा मोठा भराव पाण्याने वाहून गेला. तर तुरीचे उभे पिक पाण्यात गेल्याची माहीती शेतमालक ललिता बबन गायकवाड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT