

The risk of potential flooding has been avoided.
पैठण, पुढारी वृत्तसेवा :
पैठण येथील जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडल्यामुळे रविवारी (दि. २८) रात्री पैठण शहरातील अनेक सखल भागांत शिरले. खबरदारीची उपाययोजना म्हणून या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थानिक प्रशासनाने स्थलांतर केले होते. धरणातून मोठ्या प्रमाणावर सोडलेला विसर्ग सोमवारी (दि. २९) कमी झाल्यामुळे काही प्रमाणावर शहराची परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. यामुळे संभाव्य पुराचा धोका टाळला आहे.
या पुरामुळे शहरात सखल भागात काही घरांची पडझड झाली. नुकसान झाल्याने बाधित नागरिकांची व्यथा मात्र कायम आहे. पुराच्या पाण्यामुळे निर्माण झालेली परिस्थितीचा पाहणी दौरा करून आश्वासन देणाऱ्यांची रांग लागली आहे.
पैठण तालुक्यासह जायकवाडी धरणाच्या वरील भागात मुसळधार पाऊस झाल्याने सलग दोन दिवस मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक येथील धरणात जमा झाली. तातडीने पाटबंधारे विभागाने शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान धरणाचे सर्व २७दरवाजे उघडून गोदावरी नदीत साडेतीन लाखाहून अधिक पाण्याचा विसर्ग केला. परिणामी पैठण शहरातील यात्रा मैदान, नाथ मंदिर, गागाभट चौक, ढोलेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर व छोट्या मोठ्या दुकानात पाच फूट पाणी जमा झाले होते. नागरिकांसाठी स्थानिक प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात आहे त्या परिस्थितीत सुरक्षित स्थळे निवारा दिला. पुराचे पाणी कमी होईपर्यंत निवाऱ्यात त्यांनी रात्र जागून काढली. पाणी कमी झाल्यावर घरी आल्यावर उघडा पडलेला संसार, घरातील वाहून गे-लेले साहित्य, झालेले नुकसान पाहून त्यांना अश्रू रोखता आले नाही.
सोमवारी (दि. २९) सायंकाळी जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत २ लाख ७ हजार ५०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातील पाण्याची परिस्थिती हाताळण्यासाठी आपातकालीन व्यवस्थापन पथकासह पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता समाधान सबनीसवर, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, जालना कार्यकारी अभियंता दीपक डोंगरे, धरण उपअभियंता मंगेश शेलार, तुषार विसपुते, रितेश भोजने नियंत्रण ठेवून आहे.
बाधित नागरिकांना स्थानिक प्रशासनाने सुरक्षित स्थळी निवारा व्यवस्था केली होती. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे, प्रभाकर घुगे, कैलास बहुरे, पंचायत समिती गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी संबंधित नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न केला.
पालकमंत्री संजय शिरसाट, केंद्रीय मंत्री भागवत कराड, आमदार विलासबापू भुमरे, खासदार संदीपान भुमरे, डॉ. कल्याण काळे, माजी आमदार संजय वाघचौरे, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद तांबे यांनी बाधित नागरिकांची भेट घेतली. तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.