Heavy Rain : Grant distribution website closed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदत मंजूर केली आहे. त्यानुसार प्रशासनाकडून शासनाच्या वेबसाईटवर याद्या अपलोड करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, गुरुवारी दुपारनंतर शासनाची ही वेबसाईट बंद पडली. त्यामुळे अनुदान वितरण ठप्प झाले आहे.
यंदा मराठवाड्यासह राज्यातील इतरही अनेक जिल्ह्यांत पावसामुळे शेती पिकांचे अत-ोनात नुकसान झाले. त्यामुळे अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने ३१ हजार कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. आतापर्यंत वेगवेगळे अध्यादेश जारी करून ही मदत मंजूर करण्यात आली. त्यानुसार तालुका प्रशासनांकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांच्या याद्या मदत व पुनर्वसन विभागाच्या पंचनामा या वेबसाईटवर अपलोड करण्यात येत असून या याद्या अपलोड झाल्या की शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होत आहे.
सध्या मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात हे काम वेगाने सुरू आहे. परंतु गुरुवारी ही वेबसाईट अचानक बंद पडली. जास्त लोड आल्याने वेबसाईट बंद पडल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम थांबले आहे. जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात गुरुवारी दिवसभर तलाठी आणि इतर कर्मचारी वर्ग याद्या अपलोड करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु दुपारनंतर त्यांना यात यश आले नाही. तांत्रिक बिघाड झाला असून तो दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे, असा त्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले.
संभाजीनगर, जालन्यात ८३६ कोटी वाटपाची लगबग
राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी याआधी सुमारे तीन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर बुधवारी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासाठी ८३६ कोटी रुपयांची मदत मंजूर केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात हे अनुदान वाटपाची लगबग सुरू झाली.
शेतकऱ्यांमधील रोष पाहता लवकरात लवकर अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावरून जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार गुरुवारी दिवसभर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तहसील कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू होते. परंतु वेबसाईट बंद झाल्याने त्यात अडचणी येत होत्या.