Narendra Yadav Nationwide Cycling Expedition
वेरुळ : देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जपत त्यांच्या बलिदानाचा संदेश देशभर पोहोचविण्याचा संकल्प घेऊन हरियाणातील नरेंद्र यादव हे एकटेच सायकलवरून देशभ्रमंतीवर निघाले आहेत. शनिवारी (दि. २२) ते वेरुळ येथे पोहोचले. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली.
हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील नंदगाव येथील नरेंद्र यादव (वय ५०) हे व्यवसायाने बांधकाम मिस्त्री आहेत. त्यांनी ७ जुलै रोजी लेह-लडाख येथून आपल्या देशभ्रमंतीला सुरुवात केली. देशातील विविध भागांना भेट देत सुमारे सात हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. या प्रवासात चारधामांचे दर्शन घेण्याचाही त्यांचा मानस असून, आतापर्यंत त्यांनी सुमारे चार हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.
नरेंद्र यादव यांच्या या देशभ्रमंतीचे वैशिष्ट्य म्हणजे ते रेजांगला वॉर मेमोरियल, लेह-लडाख आणि कारगिल येथील वीर अमर शहीद जवानांच्या स्मृतिस्थळांवरील माती सोबत घेऊन प्रवास करीत आहेत. ही माती कन्याकुमारीपर्यंत घेऊन जाण्याचा त्यांचा संकल्प असून, तेथे समुद्रात तिचे विसर्जन करून शहीद जवानांना अभिवादन करणार आहेत.
यासोबतच ‘एक पेड शहीदों के नाम’ हा देशभक्तीचा संदेशही ते आपल्या प्रवासातून देशभर पोहोचवत आहेत. शहीद जवानांचे बलिदान आणि त्यांच्या स्मृती नागरिकांच्या मनात कायम राहाव्यात, तसेच त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण व्हावे, हा संदेश देत ते विविध ठिकाणी जनजागृती करीत आहेत.
नरेंद्र यादव यांचा हा पहिलाच देशभ्रमंतीचा उपक्रम नाही. त्यांनी यापूर्वी २०२२ मध्येही देशभ्रमंतीचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यांच्या देशभक्तीपर कार्याची दखल घेत २०२५ मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
सुमारे तीन महिन्यांच्या या एकल प्रवासात नरेंद्र यादव देशातील विविध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देत कन्याकुमारीकडे मार्गक्रमण करणार आहेत. लेह-लडाख येथून सुरू झालेला त्यांचा प्रवास शनिवारी वेरुळमध्ये पोहोचला. घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली.