Harsool's encroachment campaign finally comes to a halt, action will be taken as per the court order
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात महापालिकेने रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या शेकडो मालमत्तांवर बुलडोझर चालविल्यानंतर आता प्रशासन हर्सूलमध्ये खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे पाडापाडी करणार आहे. येथील मालमत्ताधारकांना रीतसर ७दिवसांची नोटीस बजावून त्यानंतर मोहीम राबविण्याचा निर्णय बुधवारी (दि.६) पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला हसूलकरांचा कडाडून विरोध सुरू होता. महापालिकेने पाडापाडी करण्यापूर्वी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नियमानुसार संपादन करूनच कारवाई करावी. त्यासोबतच भूसंपादनाचा मोबदला द्यावा, अशी मागणी लावून धरली होती. तसेच पोलिस आयुक्तांकडे महापालिकेच्या नियमबाह्य कारवाईविरोधात तक्रार केली होती. त्यात नारेगावमध्ये अशीच नियमबाह्य मोहीम राबवण्यात आल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी पथकावर दगडफेक केली होती. सुदैवाने पोलिसांनी वेळीच लाठीचार्ज केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. याच पार्श्वभूमीवर बुधवारी पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त प्रवीण पवार, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत पाडापाडीसंदर्भात बैठक झाली.
शहरात रस्तारुंदीकरणाआड येणाऱ्या बांधकामांवर कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया राबवावी, असे बैठकीत निर्णय घेण्यात आला. खंडपीठाच्या आदेशानुसार ७ दिवसांची मुदत देऊन त्यानंतर हसूल भागात कारवाई केली जाईल, असे यावेळी जी. श्रीकांत यांनी केले. या भागातील सुमारे ३०० मालमत्तांना रस्ता रुंदीकरणामुळे फटका बसणार आहे. यातील अनेकांनी स्वतःहून रस्ता बाधित मालमत्ता पाडल्या आहेत. उर्वरित २७ मालमत्त-स्पष्टाधारकांना आता नोटीस बजावली जाणार आहे. तसेच त्यांना सात दिवसांची मिळणार आहे. अतिक्रमणाच्या वेळी महापालिकेने नियुक्त केलेले माजी सैनिक कार्यरत असतात. हे माजी सैनिक आता पोलिसांच्या नियंत्रणाखाली काम करतील, असे जी. श्रीकांत यांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीला मनपा संनियंत्रण अधिकारी तथा अतिक्रमाण विभाग प्रमुख संतोष वाहुळे, उपअभियंता शिवाजी लोखंडे पाटील, सहाय्यक आयुक्त अशोक गिरी यांची उपस्थिती होती.
पाडापाडीवरच संशय
महापालिकेने सेव्हनहिल ते अग्रसेन चौकप्रमाणेच हर्सलमध्येही कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला आहे. परंतु, नारेगावच्या कारवाईला तसेच आदेश नव्हते का, चिकलठाणा, मुकुंदवाडी, पैठण रोड, बीड बायपास, पडेगाव, मिटमिटा येथे कायदेशीर प्रक्रिया राबवून कारवाई होणे अपेक्षित नव्हते का, असे सवालही बाधित मालमत्ताधारकांतून उपस्थित होत आहेत.
मनपाचीच बेकायदा कारवाई
महापालिका बेकायदा बांधकामावर कारवाई करीत असल्याचे कारण पुढे करीत आहे. प्रत्यक्षात महापालिकाच बेकायदा कारवाई करीत आहे. त्यामुळे त्यांच्या या कारवाईला पोलिस बंदोबस्त देऊ नका, अशी मागणी हसूलच्या नागरिकांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे केली होती.
आता पाडापाडी रेंगाळणार
पोलिस आयुक्तालयातील बैठकीत कायदेशीर प्रक्रिया राबवून कारवाई करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आता ७ दिवसांची नोटीस दिली जाणार आहे. या नोटीसप्रमाणे १३, १४ ऑगस्ट रोजी कारवाई होणे अपेक्षित आहे. जर या दोन दिवसांत कारवाई झाली नाही. १५ ऑगस्ट आणि त्यानंतर लागलीच गणपती उत्सव, नवरात्रोत्सव येणार आहे. त्यामुळे पाडापाडीला पूर्णविराम लागेल का, अशी शक्यता व्यक्त होत आहे.