गुलमंडीत चोरांचा धुमाकूळ ! काका-पुतण्याची ड्रायफ्रुटची दुकाने फोडली pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : गुलमंडीत चोरांचा धुमाकूळ ! काका-पुतण्याची ड्रायफ्रुटची दुकाने फोडली

२.५० लाख रोखसह दागिने लंपास ; शटर उचकटून रात्रीत डल्ला

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अत्यंत वर्दळीच्या मानल्या जाणाऱ्या गुलमंडी भागात एकाच रात्रीत काका आणि पुतण्याची शेजारी-शेजारी असलेली दोन ड्रायफ्रूटची दुकाने फोडल्याची घटना गुरुवारी (दि.१४) सकाळी उघडकीस आली.

चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून अडीच लाखांच्या रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी दीपक ईश्वरदास बादशहा (६९, रा. देवका अपार्टमेंट, पानदरीबा) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे गुलमंडी पार्किंगसमोर दीपक ट्रेडर्स नावाचे ड्रायफ्रूटचे दुकान आहे. तर त्यांच्या शेजारीच त्यांचा पुतण्या हर्षद नवीनचंद्र बादशहा याचे न्यू दीपक ट्रेडर्स हे दुकान आहे.

बुधवारी (दि. १३) रात्री ११ वाजेच्या सुमारास काका-पुतणे नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून घरी गेले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या दुकानांना लक्ष केले. गुरुवारी पहाटे ५:२० वाजेच्या सुमारास दुकानासमोरील तिरुपती मेडिकलच्या मालकीण खटोड यांनी हर्षद याला फोन करून दुकानाचे शटर अर्धवट उचकटलेले आणि कुलूप खाली पडलेले असल्याचे सांगितले. या माहितीवरून काका पुतण्याने तत्काळ दुकानावर धाव घेतली.

असा उडवला मुद्देमालः

दुकानात जाऊन पाहिले असता सर्व ड्रॉवरचे कुलूप तोडलेले आणि साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले आढळले. चोरट्यांनी पुतण्या हर्षद याच्या दुकानातून १ लाख ५० हजारांची रोख रक्कम चोरली. तर पुतण्याच्या दुकानातूनच काकाच्या दुकानात जाण्यासाठी रस्ता असल्याने चोरट्यांनी दीपक ट्रेडर्समध्येही प्रवेश केला. तेथून १ लाख रुपयांची रोख रक्कम, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि २०० ग्रॅमची चांदीची पायातील बेडी असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज पळवला. दोन्ही दुकानांमधून एकूण २ लाख ८० हजार रुपयांची चोरी झाली. पुढील तपास हवालदार ज्ञानेश्वर फुके करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT