

Gangsterism in Mukundwadi: Medical Store Robbed at Knifepoint
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हप्ता वसुलीच्या वादातून खुनाची घटना घडून काही दिवस उलटत नाही तोच मुकुंदवाडीत पुन्हा गुन्हेगारांची दहशत पहायला मिळत आहे. मेडिकल चालकाच्या पोटाला चाकू लावून गुंडाने दोन वेळा पैसे उकळले. हा प्रकार २९ एप्रिल आणि ९ मे रोजी जयभवानी नगर येथील दिलीप मेडिकलवर घडला. भरत जॉन शंकर तीर्थे (रा. रेल्वे पटरीपलीकडे, मुकुंदवाडी) असे लूटमार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी दिलीप बबनराव पवार (४२, रा. भावसिंगपुरा) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे जयभवानी नगर गल्ली क्र ११ येथे दिलीप मेडिकल नावाने दुकान आहे. २९ एप्रिलला आरोपी जॉन याने मेडिकलवर येऊन एनर्जी ड्रिंक आणि चॉकलेट मागितले.
त्याला पैशाची मागणी करताच त्याने चाकू काढून दिलीप यांच्या पोटाला लावला. तूच मला १ हजार रुपये दे असे म्हणत काउंटरमधून पैसे काढून घेतले. पोलिसांत तक्रार केली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत बाहेर जाऊन ड्रिंक पिऊन अंगावर बाटली फेकून निघून गेला. त्यानंतर शनिवारी (दि.९) पुन्हा जॉन मेडिकलवर आला. तेव्हा योगेश कुंदे हा मुलगा मेडिकलवर कामाला होता.
त्याच्याकडे पायाला जखम झाली त्यासाठी गोळ्या दे अशी जॉनने मागणी केली. योगेशने दिलीप भाऊ बाहेर गेलेत, मी गोळ्या देऊ शकत नाही असे सांगितले. तेव्हा त्याने चाकू काढून योगेशच्या हाताला लावला. तुला आज खल्लास करून टाकतो अशी धमकी देत १ हजार रुपयांची मागणी केली. योगेशने घाबरून काउंटरमधून २०० रुपये काढून जॉनला दिले. ते घेऊन तो निघून गेला. या गुंडगिरीला वैतागून दिलीप यांनी तत्कळ मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी
आरोपी जॉन तीर्थे हा सराईत असून त्याच्याविरुद्ध हाणामारीचे काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्या हद्दप-ारीचा प्रस्ताव तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. मात्र, तो अद्यापही हद्दपार झालेला नाही. त्यामुळेच त्याची चाकूच्या धाकावर लूटमार करण्यापर्यंत मजल गेल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे