Grand group singing today to mark the 50th anniversary of Vande Mataram
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा ठरलेले आणि जनतेच्या मनातील देशभक्ती चेतवणारे 'वंदे मातरम्' गीत आज १५० वर्षे पूर्ण करत आहे. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधत शुक्रवारी (दि.७) सकाळी ९ वाजता क्रांती चौक येथे भव्य राष्ट्रगान समूहगायन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, संघटना आणि नागरिकांच्या उपस्थितीत देशभक्तीचा जयघोष दुमदुमणार आहे.
या कार्यक्रमाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री अतुल सावे यांनी माहिती दिली. यावेळी खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर, भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि अनिल मकरिये उपस्थित होते. मंत्री सावे म्हणाले, 'वंदे मातरम्' हे गीत नाही, तर आपल्या मातृभूमीचा सुगंध आहे. हे गीत देशभक्ती, बलिदान आणि अभिमानाचे प्रतीक आहे. क्रांती चौकातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हे गीत सामूहिकपणे गायिले जाणार आहे. या ठिकाणीच ब्रिटिश सैन्याने २१ क्रांतिकारकांना फाशी देताना त्यांच्याकडून 'वंदे मातरम्'चा जयघोष झाला होता. हे गीत १८७० मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचले असून, १८८२ मध्ये त्यांच्या मआनंदमठफ या कादंबरीत प्रथम प्रकाशित झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये कोलकाता येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात ते प्रथम गायिले. नंतर १९५० मध्ये भारतीय संविधान सभेने त्याला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला.
खा. डॉ. कराड म्हणाले, केंद्र सरकारने देशभरातील १५० ठिकाणी या कार्यक्रमांचे आयोजन केले असून, मराठवाड्यातील एकमेव ठिकाण म्हणून छत्रपती संभाजीनगरची निवड झाली आहे. आ. संजय केणेकर म्हणाले, 'वंदे मातरम्' हे ऊर्जास्तोत्र क्रांतिकारकांच्या बलिदानाचे प्रतीक आहे. आज या गीतातून पुन्हा एकदा राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित होणार आहे. या भव्य कार्यक्रमासाठी शहरवासीय, विद्यार्थी व सर्व धर्मीय नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. क्रांती चौक देशभक्तीच्या ओजस्वी स्वरांनी आज पुन्हा एकदा गुंजणार आहे.
कान्हेरे यांनी शहरात पेटवली 'वंदे मातरम्' ज्योत
शहरातील अनंत कान्हेरे यांनी स्वातंत्र्याचा लढा सुरू असताना सुमारे २५ जणांची टीम घेऊन 'वंदे मातरम्' हे गीत गात सिटी चौक ते गुलमंडीपर्यंत गेले होते. त्यांनीच शहरात त्याकाळी 'वंदे मातरम्' ज्योत पेटवली होती. त्यामुळे वंदेमातरम् या गीताचा व शहराचा जिव्हाळ्याचा संबंध असल्याचे केणेकर यांनी सांगितले.