Gram Panchayat employees' issues will be raised in the session
करमाड, पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट वेतन का दिले जात नाही, त्यांना असे टप्प्याटप्प्याचे मार्ग का, असा प्रश्न विचारत यात सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडून कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जाईल, अशी ग्वाही राज्याध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली.
हे अधिवेशन तुमचे तर पावसाळी अधिवेशन आमचे अशा शब्दांत त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विश्वास दिला. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने विविध मागण्यांचा अजेंडा घेऊन राज्यस्तरीय अधिवेशन लाडगाव येथे शनिवारी (दि.२०) आयोजित केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. या अधिवेशनाला प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, कार्याध्यक्ष बंडू जवणजाळ, राज्य उपाध्यक्ष दत्ता भोईर, कोषाध्यक्ष विकास भोईर, सचिव अशोक कुथे, सहसचिव नागसेन खंदारे, विभागीय अध्यक्ष संतोष शिंदे, संपर्क प्रमुख दिगंबर सोनटक्के, राज्य सदस्य एकनाथ कीर्तीकर, विभागीय सचिव दर्शन डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवाजी बागल, दत्ता चौधरी, गणेश भालेराव, ज्ञानेश्वर मोरे, ज्ञानेश्वर अहिरे, सुदाम पठाडे, डीडी डोंगरे, अनिल नाडे, आदेश मोकळे, गणेश खिरे, कल्याण ठोंबरे, विठ्ठल उकर्डे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्यासह राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचारी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
शासनदरबारी पाठपुरावा
संस्थापक राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर यांनी आपल्या भाषणातून २५ वर्ष युनियनच्या कार्यक्रमाचा लेखाजोखा सांगून युनियनच्या विविध आंदोलने, शासनदरबारी पाठपुरावा कशा पद्धतीने केला याची माहिती यावेळी दिली. तसेच युनियनचे कार्याध्यक्ष अलाउद्दीन काजी, राज्य उपाध्यक्ष दिलीप डिके यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या अधिवेशनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.