कृषी समितीची मासिक सभेत उपस्थित मान्यवर. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Agriculture demands Sambhajinagar : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा

कृषी समिती सभा : हमीभाव, खत साठेबाजीवर उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्यासाठी जिल्हास्तरावर धान्य महोत्सव आयोजित करणे, कापसाच्या बीटी बियाण्यांच्या घसरलेल्या दर्जावर नियंत्रण आणणे यांसह शेतीसंदर्भातील प्रश्नांवर शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक सभा शुक्रवारी (दि. ८) जि. प. उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती जितेंद्र जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष दालनात पार पडली. सभेस गीतांजली पाथ्रीकर, अर्जुन पाटील, आयेशाबेगम सय्यद, कल्याण गायकवाड, उत्तम चव्हाण, आजीनाथ धामणे, संगीता अमराव तसेच कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी शेतकरी ते थेट ग्राहक या संकल्पनेतून जिल्हास्-तरावर तीन दिवसांचा धान्य महोत्सव आयोजित करण्याची सूचना सभेत करण्यात आली. यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊ न ग्राहकांना योग्य दरात धान्य मिळेल, तर शेतकऱ्यांनाही अधिक मोबदला मिळू शकेल, असे मत व्यक्त करण्यात आले. शेतमाल खरेदी प्रक्रियेत असलेल्या जाचक अटी शिथिल करून हमीभावासह माल खरेदी सुलभ करावी, यासाठी शासन व मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.

बायोगॅस योजना प्रभावीपणे राबविणे, क्लस्टर विकसित करणे, कृषी विभागाच्या योजनांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविणे, खत व बियाणे विक्रीसाठी ट्रॅकिंग व्यवस्था उभारणे तसेच खत साठेबाजीवर नियंत्रण आणण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

बैठकीत कापसाच्या बीटी बियाण्यांच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. डीसीएच-३२ व नांदेड-४४ सारखी वाण अधिक उत्पादन देत असल्याचे नमूद करत आंतरराष्ट्रीय दर्जाचे बीटी वाण उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन रसायनमुक्त अन्न उत्पादनासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता सदस्यांनी मांडली.

शेतकऱ्यांचे पीकविमा नाकारण्यावर चाप लावण्याची मागणी

पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीकविमा नाकारले जाण्याच्या प्रकारांवर चाप लावावा, कृषी सेवा केंद्र चालकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, ग्रामस्तरावरील कृषी कर्मचारी ग्रामसभांना उपस्थित राहावेत व निवासी असावेत, अशा मागण्याही सभेत करण्यात आल्या. समूह शेतीला प्राधान्य, दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत, पोखरा योजना सर्वसामान्यांसाठी सुलभ करणे तसेच पीककर्जासाठी बँकर्सची बैठक घेण्याची आवश्यकता सदस्यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT