GR of Maratha reservation is correct: Jarange
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठा आरक्षणाचा शासन निर्णय योग्य असून, सुधारणा करण्यासारखे काही नाही, मात्र शासन निर्णयात अंमलबजावणीदरम्यान शुद्धिपत्र किंवा सुधारणा होतच असते, असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी व्यक्त केले. त्यामुळे हैदराबाद गॅझेटमध्ये काही बदल झाले तरी ते क्रमप्राप्त असून, त्याला आमचा विरोध नाही. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होणे हेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
हैदराबाद गॅझेटबाबत शासनाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी रविवारी (दि.७) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षणात घुसखोरी केलेल्यांना बाहेर काढावे. १९९४ च्या जीआरनुसार ही कारवाई व्हावी. आमच्या हक्काच्या नोंदी असताना आम्हाला रोखण्याचा अधिकार कुणाला दिला? १६ टक्के आरक्षणाचा जीआर कोणत्या आधारावर काढला होता? असा सवाल त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना उद्देशून केला.
विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, कुणी काय बोलतो, गैरसमज पसरवतो, त्याचे आम्हाला काही देणेघेणे नाही. सरकारने जीआर काढल्यानंतर आम्ही तो वकिलांकडून व अभ्यासकांकडून तपासून घेतला आहे. दुरुस्ती व्हावी लागते हे स्वाभाविक आहे. नागपूरमधील ओबीसी मोर्चाबाबत ते म्हणाले, आमचे त्यांच्याशी काही घेणेघेणे नाही. आम्ही सरकारशी भांडतो. जातीविरोधात लढण्याऐवजी स्वतःच्या जातीसाठी लढा, त्यातूनच तुमचे भले होईल.
मराठा समाजाला टप्प्याटप्प्याने आरक्षणात समाविष्ट केले जात आहे. पहिल्या टप्प्यात दोन लाखांना प्रमाणपत्र मिळाले असून, आता पुन्हा प्रक्रिया राबवून इतरांना जातीचे प्रमाणपत्र मिळणार आहेत. सर्व गरीब आणि गरजू मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच मला खरी समाधानाची जाणीव होईल, असे जरांगे म्हणाले.
शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर मनोज जरांगे यांना सोमवारी डिस्चार्ज मिळणार आहे. अंतरवाली येथे पोहोचल्यावर सर्व ग्रामदेवतांचे दर्शन घेणार आहेत. सायंकाळी चार वाजता ते नारायणगडावर दर्शनासाठी जाणार असून, आंदोलनाला यश मिळू दे, पुन्हा दर्शनाला येईन, असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. प्रकृतीत सुधारणा होताच शिवनेरी गडावर शिवाई देवी आणि शिवछत्रपतींच्या दर्शनालाही जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात देवाभाऊ म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झळकलेल्या बॅनरांबाबत विचारल्यावर जरांगे म्हणाले, ङ्गङ्घकोणी बॅनर लावले तर आम्ही कौतुकच करू, पण त्याचवेळी प्रमाणपत्र देण्याचे काम तातडीने व्हायला हवे. सरकारने कामे केली तर आम्ही त्यांचे अभिनंदन करू. मात्र मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर आम्ही पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात जाऊ.