Government's decision on Maratha reservation issue wrong: Prakash Ambedkar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. ओबीसींचे आरक्षणाचे ताट आणि मराठ्यांच्या आरक्षणाचे ताट हे वेगवेगळेच असले पाहिजे, असे प्रतिपादन वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि.९) पत्रकार परिषदेत केले.
ॲड. प्रकाश आंबेडकर मंगळवारी शहरात मुस्लिम विद्यार्थी स्कॉलरशिप परिषदेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा अध्यादेश सरकारने काढला. त्यानुसार नोंदीचा आधार घेत मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजामध्ये प्रचंड रोष आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सरकारने घेतलेला निर्णय हा कायद्याला धरून नसल्याचे आंबेडकर म्हणाले. येथील निजामी सत्तेतील मराठ्याला गरीब मराठा व ओबीसी यांच्यात भांडण लावायचे आहे. निजामी मराठा सर्वच पक्षात आहे, त्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले, त्याला निजामी मराठ्यांनीच पूर्णपणे पाठिंबा दिला.
भाजप आरक्षण विरोधी सरकारच्या भूमिकेनंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. भाजप हमेशा आरक्षण विरोधी भूमिकेत आहे. भाजपने त्यांची मानसिकता वारंवार दाखवून दिली आहे. यात आपलीही पोळी भाजून घेण्यासाठी तेही या गोंधळात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला.
सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे महाराष्ट्र राज्य मुस्लिम विद्यार्थी स्कॉलरशिप परिपदेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी हज हाऊस येथे मार्गदर्शन केले. बाळासाहेबांनी बार्टी, सारथी, महाज्योती विद्यार्थ्यांप्रमाणे मुस्लिम विद्यार्थ्यांनासुध्दा फिलोशिप, स्वाधार एमपीएससी, यूपीएससी, बँकिंग, रेल्वे भरती, नीट आदींसाठी शासनाने अनुदान द्यावे, असे सूचवले. या सभेचे नियोजन सम्यकचे जिल्हाध्यक्ष अक्रम खान, शारेख काजी, संदीप तुसमुद्रे, अमोल बोर्डे, अमोल घुगे, अलबिना शेख, अदिबा खान, जैद खान, अरहम खान, इर्बाज अन्सारी यानी केले होते.