पैठण : मराठवाड्यातील शेती सिंचन, औद्योगिक वसाहतीला नवीन संजीवनी देणाऱ्या पैठण येथील नाथसागर धरणाच्या वरील भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे आवक आहे. परिणामी नाथसागर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून. मंगळवारी दि.८ रोजी सायंकाळी सहा वाजता येथील नियंत्रण कक्षात नोंद केल्यानुसार धरणाच्या पाण्याची टक्केवारी ६१ % झाली. वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक ५३ हजार ३३४ क्युसेक आहे.
नाशिक परिसरात गेल्या दोन-तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने या परिसरातील छोट्या मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हे पाणी नाथसागर धरणात पोहचत आहे त्यामुळे पाणीपातळी झपाट्याने वाढ होत असून मंगळवारी रोजी सायंकाळी येथील नाथसागर धरणात ५३ हजार ३३४ क्युसेक पाण्याची आवक झाली.
आजमितीला नाथसागर धरणाच्या पाण्याची टक्केवारी ६१ % झाल्याची नोंद पैठण येथील नाथसागर धरण नियंत्रण कक्षात करण्यात आली. येणाऱ्या दोन दिवसात अधिक पाणी नाथसागर धरणात येऊन जमा होणार असल्याने धरणातील पाण्याची टक्केवारी ६५ टक्यापर्यंत होणार असल्याचा अंदाज येथील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान नाथसागर धरणाच्या इतिहासात २५ वर्षानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरण ६१% च्या पुढे पाणीसाठा उपलब्ध झाल्याने या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यासह औद्योगिक परिसरातील कंपनीचा पाणी प्रश्न मिटला आहे. धरणाच्या परिसरात असलेल्या गावांच्या विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यात आनंद व्यक्त केले जात आहे.