Give space to the homeless to build houses: MLA Abdul Sattar
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील महसूल विभागांतर्गत नागरी वसाहतीमधून जात असलेला रेल्वे मार्गाला नागरिकांचा असलेला विरोध त्याशिवाय तातडीने महसूल विभागातील रिक्त जागा भरणे, गुंठेवारीची अंमलबजावणी करणे व बेघराना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे व इतर प्रश्नांसंदर्भात बैठक घेऊन तातडीने विषय मार्गी लावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विविध विषयांच्या संदर्भात तसेच प्रशासकीय अडीअडचणी सोडविण्याबाबत मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल विभागाच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री बावनकुळे यांनी सदरील सूचना दिल्या. या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदरील विषय तातडीने मार्गी लावण्याबाबत आमदार अब्दुल सत्तार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रदेखील दिले. यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेत हे विषय मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. महसूल विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अव्वर सचिव घोरपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत उपस्थित होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे दुरदृष्यप्रणालीने सहभागी झाले होते.
सिल्लोड तालुक्यातील गावांचा डोंगरी भागामध्ये समावेश करणे
सिल्लोड येथील प्रशासकीय इमारतीकडे जाणारा रस्ता व प्रवेशद्वार बांधकाम करणे
अजिंठा गावात अप्पर तहसील कार्यालय इमारत मंजूर करून प्रत्यक्षात अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे
सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी भवन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणे
गायरान जमिनीमधील अतिक्रमण धारकांची भोगवटादार म्हणून नोंद घेणे
सिल्लोड व सोयगाव तहसील कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील रिक्त जागा भरणे यासह दोन्ही तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक मागण्या आग्रहपूर्वक मांडण्यात आल्या.