

Vehicle windows were broken in Mukundwadi, a case was registered at the police station.
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी भागातील प्रकाशनगर येथे टवाळखोरांचा धुमाकूळ सुरूच असून शुक्रवारी (दि.१८) रात्री पुन्हा दोन वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. फिर्यादी महेश तात्यासाहेब काटे (३५, रा. प्रकाश नगर, गल्ली क्र ४, मुकुंदवाडी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे चारचाकी वाहन (एमएच-१४-ईवाय-८९४८) घराच्या बाजूला मारोती मंदिर येथे अभिने केले होते. त्यांच्या व्हॅनच्या डाव्या बाजूची काच अज्ञाताने फोडून टेपची नासधूस केली. शेजारी उभ्या दुसऱ्या एका चारचाकीच्या सुद्धा काचा फोडल्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या भागातील नागरिकांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात टवाळखोरांचा त्रास होत असल्याची तक्रार दिली होती. मात्र, कडक कारवाई न झाल्याने टवाळखोरांची हिंमत वाढली असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ दिवसांपूर्वीच टवाळखोरांनी प्रकाशनगर, विठ्ठलनगर, तान्हाजीनगर भागात वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. टवाळखोरांची हिम्मत एवढी वाढली आहे की नशापाणी करून मुलींची छेड काढतात. विरोध केल्यास मारहाण करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. त्यानंतर पुन्हा दोन वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याने पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे दिसून येत आहे.