

Siddharth Udyan closed; Botanical Garden preferred
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : प्रवेशव्दाराची कमान को-सळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर सुमारे दीड महिन्यापासून सिध्दार्थ उद्यान बंद असल्याने शहरवासीयांनी विरुंगळ्यासाठी सिडकोतील बॉटनिकल गार्डनला पंसती दिल्याचे दिसून आले. या उद्यानात रविवारी (दि. २०) बच्चे कंपनीसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी लहानग्यांनी गार्डनमधील खेळण्यांचा मोनसक्त आनंद घेतला.
सुमारे दीड महिन्यापूर्वी सिद्धार्थ उद्यानाची प्रवेशव्दाराची कमान कोसळली. त्यानंतर महापालिकेकडून या उद्यानाची दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असल्याने या उद्यानात नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नियमित फिरणारे, व्यायाम करणारे आणि कुटुंबासह वेळ घालवणारे नागरिक पर्यायी ठिकाण शोधत होते.
दरम्यान हिरवळ, शांतता आणि आकर्षक परिसर असलेल्या सिडकोतील एन ६ बॉटनिकल गार्डनला पर्यटकांनी पसंती दिली असल्याचे रविवारी दिसून आले. या गार्डनमध्ये तरुण, तरुणींसह महिला, बच्चे कंपनीसह वृध्दांची अधिक गर्दी दिसून आली.
यावेळी मुलांनी या ठिकाणच्या विविध झाडांची माहिती घेणे, फुलांची रंगसंगती पाहणे यासह बच्चे कंपनीने उद्यानातील विविध खेळण्यांचा आनंद लुटला. या ठिकाणच्या झुला, स्लाइड्स, धावण्यासाठी मोकळी जागा आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याची मजा मुले आणि पालकांनी मनमुराद अनुभवली.
बागेच्या प्रवेशद्वारापासून ते आतमध्येही स्वच्छता आणि चांगल्या प्रकारे देखभाल राखली जात असल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करताना दिसून आले. दरम्यान सिद्धार्थ उद्यान कधी सुरू होणार याची उत्सुकता कायम असली, तरी तोपर्यंत बॉटनिकल गार्डन शहराचा हिरवा श्वास बनला असल्याचे नागरिकांच्या गर्दीवरून दिसून आले.