घाटीतील अत्याधुनिक 'न्युरो रिहॅबिलिटेशन सेंटर' मधील डॉक्टर्स आणि परिचारिका. लवकरच हे सेंटर पूर्ण क्षमतेने रुग्णसेवेसाठी सुरू होईल. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : घाटी'त राज्यातील पहिले 'न्युरो रिहॅबिलिटेशन सेंटर'

शासकीय रुग्णालयात पहिल्यांदाच अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची पर्वणी

पुढारी वृत्तसेवा

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर: घाटीतील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात १५ कोटींच्या निधीतून अत्याधुनिक 'न्युरो रिहॅबिलिटेशन सेंटर' सुरू होत आहे. युरोपातून आलेल्या अत्यंत प्रगत, रोबोटीक यंत्रसामग्रीने सुसज्ज असे हे राज्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयांपैकी पहिलेच सेंटर ठरणार आहे. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या पुढाकाराने रुग्णसेवेत दाखल या सेंटरमुळे पॅरालिसिस आणि ब्रेन स्ट्रोक तसेच मज्जातंतूंच्या विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना दिलासा मिळून त्यांचे आयुष्य सुकर होणार आहे.

पूर्वी वयाच्या साठीनंतर होणारे लकवा किंवा स्ट्रोकचे हा आजार आता ३० ते ४० वर्ष वयोगटातील तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानावर साकारलेल्या या सेंटरमध्ये लकवा, मज्जातंतूंचे आजार आणि चालण्या-बोलण्यात अथवा हात-पाय हलवण्यात अडचण असलेल्या रुग्णांसाठी जगातली अत्यंत प्रगत यंत्राव्दारे पक्षाघात, पाठीच्या मणक्याला दुखापत, पार्किन्सन किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार केले जातील.

व्हर्चुअल रियालिटी आणि विविध खेळांसारख्या व्यायामांच्या माध्यमातून रुग्णांच्या शरीराच्या योग्य हालचाली घडवून त्यांच्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छाशक्ती जागृत केली जाईल. अधिष्ठाता डॉ. सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मकरंद कांजळकर आणि फिजिओथेरेपिस्ट डॉ. आकाश खरात हे या केंद्राचे प्रमुख आहेत. मुंबई येथील फिजिओथेरपीस्ट डॉ. योगीता म्हात्रे आणि डॉ. पायल मोहिते याही रुग्णसेवेत आहेत.

तत्पूर्वी या रोबोटिक यंत्राव्दारे रुग्णांवर कसे उपचार करावेत. याचे सखोल प्रशिक्षण युके येथील तज्ज्ञांनी डॉ. दर्पण खडकीकर, डॉ. शर्वरी कुलकर्णी, इंचार्ज सिस्टर प्रतिभा अंधारे, ब्रदर रावसाहेब कांबळे, सिस्टर माधुरी मकासरे, शिल्पा निकाळजे यांना दिले. एक महिना हे प्रशिक्षण सुरू होते.

८० टक्के रुग्णांना पूर्ववत बळ

या अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे व्हीलचेअरवर किंवा गंभीर स्वरूपात आजारी असलेले रुग्णही योग्य आधारासह उभे राहून स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण मिळवू शकतात. प्रत्येक रुग्ण उपचारांना कसा प्रतिसाद देतो यावर बरेच अवलंबून असले तरी रोबोटिक यंत्राव्दारे ७० ते ८० टक्के रुग्णांमध्ये लक्षणीय सुधारणा होतात. असे डॉक्टरांनी सांगितले.

सामान्य रुग्णांना आधुनिक उपचारसेवा

लकवा किंवा स्ट्रोक, अपघात व न्यूरो आजारांच्या रुग्णांना दीर्घकालीन उपचार आणि पुनर्वसनाची गरज असते. सध्या अशा सुविधा खासगी रुग्णालयांपुरत्या मर्यादित असून, त्याचा खर्च अनेक कुटुंबांना परवडत नाही. मात्र, आता घाटीत नवीन सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना अत्यल्प दरात या आधुनिक सेवा मिळणार आहे.

प्रगत यंत्रसामग्रीचे राज्यातील पहिलेच सेंटर- पॅरालिसिस आणि ब्रेन स्ट्रोक तसेच मज्जातंतूंच्या आजाराने ग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीत डीपीसीच्या १५ कोटी निधीतून अत्याधुनिक 'न्युरो रिहॅबिलिटेशन सेंटर' सुरू होत आहे. युरोपातून आलेल्या अत्यंत प्रगत, रोबोटीक यंत्रसामग्रीने सुसज्ज असे हे राज्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयांपैकी पहिलेच सेंटर आहे.
डॉ. शिवाजी सुके, अधिष्ठाता, घाटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT