

केज : वाटणी पत्र आणि संमती पत्रा आधारे वडिलांच्या नावे असलेल्या २३ आणि ११ गुंठे जमीन दोन भावांच्या नावाने प्रत्येकी ३४ गुंठे जमिनीचा फेर नोंद घेण्यासाठी एका ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी एका भावा कडून ७ हजार लाच घेतली त्यानंतर दुसऱ्या भावाकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना लाज सोडलेल्या लाचखोर ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या.
केज तालुक्यातील उमरी येथील पुरुषोत्तम यादव यांनी वाटणी पत्रा आधारे त्यांची मुले अक्षय व दादासाहेब यांना सर्व्हे नंबर १९३ प्रत्येकी २३-२३ आर जमीन ही वाटणी पत्र करून दिले आहे. तसेच दुसरी ११-११ गुंठे जमीनीचे संमती पत्र देऊन ती दोन्ही मुलांच्या नावावर नोंद करण्यास संमती दिली आहे. दरम्यान त्याची नोंद महसुली अभिलेख्याला घेण्यासाठी उमरी सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर फलके यांनी त्यांना दहा हजार रु. ची लाच मागितली होती. त्या पैकी फलके यांनी या पूर्वीच दादासाहेब यादव यांच्या कडून ७ हजार रु. स्वीकारले होते.
त्या नंतर ग्राममहसूल अधिकारी परमेश्वर फलके यांनी दादासाहेब यादव यांच्याकडे ८ हजार रु. साठी तगादा लावला. परंतु अक्षय यादव यांना ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर फलके यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्या नंतर दि. ७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचखोर ग्राम महसूल अधिकारी फलके यांना रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा लावला.
दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास परमेश्वर फलके हे केज तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या महसूल मंडळ अधिकाऱ्याच्या दालनात त्याने अक्षय यादव यांच्या कडून लाच स्वीकारली आणि ते रंगेहाथ पकडले गेले. फलके याच्या विरुद्ध गुन्हा पोलीस निरीक्षक समाधान बळीराम कवडे यांच्या तक्रारी वरून गु र नं ६४०/२०२६ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचे कलम ७, ७ (अ) नुसार गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ हे पुढील तपास करीत आहेत.
यायला लागलो असे म्हणताच अधिकाऱ्यांनी चतुर्भुज केले
ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर फलके यांनी अक्षय यादव यांच्याकडून लाच स्वीकारल्या नंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांना खूण करण्यासाठी अक्षय यादव हे मोबाईल कानाला लावून मोठ्याने म्हणाले "बाबा मी यायला निघालो गावाकडे." हे ऐकताच बाजूला दबा धरून बसलेले लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी झडप घालून फलके याला रंगेहाथ ताब्यात घेतले.