केंद्रीय स्वास्थ्य उपायुक्त डॉ. गुप्ता आणि डॉ. कोमल वाधवा यांनी आढावा घेतला. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Ghati Hospital : घाटीचा शिशू विभाग बनणार राष्ट्रीय स्तरावरील 'टिओटी'

केंद्रीय पथकाने रुग्णसेवेचा आढावा घेत केले कौतुक; प्रशिक्षणातून कुशल कर्मचारी घडवण्याची क्षमता

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : घाटीतील नवजात शिशू विभागातील उत्कृष्ट पायाभूत सुविधा, लेव्हल-३ एनआयसीयू आणि तज्ज्ञ डॉक्टरांमुळे हा विभाग राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संसाधन आणि कौशल्य विकास केंद्र बनण्यास सक्षम आहे. याद्वारे 'ट्रेनर्स ऑफ ट्रेनर्स' (टिओटी) पद्धतीने डॉक्टर व परिचारिकांना प्रशिक्षण देऊन मोठ्या प्रमाणावर कुशल आरोग्य कर्मचारी घडवता येतील. असे केंद्रीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालय उपायुक्त डॉ. शोभना गुप्ता आणि डॉ. कोमल वाधवा यांनी नमूद केले.

नवजात शिशू विभागास प्रत्यक्ष भेट देत त्यांनी येथील विविध सेवा, रुग्ण व्यवस्था, प्रशिक्षण उपक्रम, शैक्षणिक कार्य, क्षमता वृद्धी कार्यक्रम तसेच भविष्यातील विस्ताराच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे उपअधिष्ठाता डॉ. सुचिता जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. तृप्ती जोशी, डॉ. अतुल लोंढे, डॉ. संतोष कडले, डॉ. वर्षा पवार, डॉ. कीर्ती राठोड व विभागातील सर्व परिचारिका उपस्थित होत्या.

या भेटीदरम्यान त्यांनी विभागाने गंभीर आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी उभारलेली सक्षम व्यवस्था, वैद्यकीय व परिचारिका कर्मचाऱ्यांचे समर्पित कार्य आणि विभागामध्ये सातत्याने राबविण्यात येत असलेल्या क्षमता-वृद्धीच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. विशेषतः प्राध्यापक व इतर अध्यापक, डीएम निवासी डॉक्टर, परिसेविका, सर्व अधिपरिचारिका आणि संशोधन कर्मचाऱ्यांनी विभागाच्या प्रगतीसाठी घेतलेल्या परिश्रमांची त्यांनी प्रशंसा केली.

डॉ. एल. एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विभागातील रुग्णसेवेसोबतच शिक्षण, प्रशिक्षण आणि नवजात शिशू आरोग्यसेवेच्या क्षमता-वृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले. भविष्यात हा विभाग राष्ट्रीय स्तरावर नवजात शिशू आरोग्यसेवेच्या कौशल्य विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे उपायुक्त डॉ. शोभना गुप्ता यांनी नमूद केले.

भविष्यासाठी व्यापक दृष्टी

या महत्त्वपूर्ण भेटीचे नियोजन आणि समन्वयन विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अतुल लोंढे यांनी केले. विभागाच्या सध्याच्या कार्याचा आढावा आणि भविष्यातील व्यापक आराखडा एनएचएम प्रतिनिधींसमोर प्रभावीपणे सादर करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT