Sambhajinagar helmet rule : आजपासून 'हेल्मेट सक्ती'ची शहरात कडक अंमलबजावणी

आता केवळ दुचाकी चालवणाऱ्यालाच नव्हे, तर दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे बंधनकारक असणार
Helmet
HelmetPudhari
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरात प्राणांतिक अपघातांमध्ये जाणारे निष्पाप बळी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आता कठोर पाऊल उचलले आहे. आजपासून (१ सप्टेंबर) संपूर्ण शहरात 'हेल्मेट सक्ती'ची अत्यंत कडक अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, आता केवळ दुचाकी चालवणाऱ्यालाच नव्हे, तर दुचाकीवर मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कारवाईचे कडक निर्देश दिले आहेत.

Helmet
Parbhani Politics : परभणीत महायुतीत ताणाताणी वाढण्याची चिन्‍हे

अधिक माहितीनुसार, राज्यभरात अपघाती मृत्यूंची संख्या १० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश पोलिस महासंचालक कार्यालयाने दिले आहेत. शहरात जानेवारी ते मे २०२६ या अवघ्या पाच महिन्यांत रस्ते अपघातात तब्बल २४४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जून महिन्यातच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शासकीय कार्यालयांमधून हेल्मेट सक्तीला सुरुवात केली होती.

सोमवारी (दि.३१) पोलिस आयुक्तांनी उपायुक्त शर्मिष्ठा घारगे, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांच्यासह सर्व प्रभारी अधिकारी यांची बैठक घेऊन कारवाईच्या कडक सूचना दिल्या. विना हेल्मेट दुचाकी चालकावर यापूर्वी केवळ वाहतूक शाखा ही कारवाई करत होती, मात्र आता शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स्वतःच्या हद्दीत आपल्या पथकासह दररोज रस्त्यावर उतरून कारवाई करतील.

दररोज सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत विशेष मोहीम राबवून विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर केसेस केल्या जातील. या मोहिमेसाठी जर स्टाफ कमी पडला, तर मुख्यालयातून अतिरिक्त पोलिस कुमक उपलब्ध करून दिली जाईल, असेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता गल्लीबोळातही विना हेल्मेट फिरणाऱ्यांची खैर नाही.

Helmet
Rambai Ranveer inspirational story : लेकीच्या शिक्षणासाठी आईची मॅरेथॉन दौड!

ऑगस्ट महिन्यात वाहतूक शाखेने शासकीय कार्यालये, पोलिस कर्मचारी यांच्यासह अन्य मिळून तब्बल ५ हजार ६०० हेल्मेट सक्तीच्या दंडात्मक कारवाया केल्या. त्यात चार दिवसांपूर्वीच नागरिकांना ट्रेलर दाखवत अवघ्या चार तासांत विना हेल्मेट फिरणाऱ्या तब्बल ११३० दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली.

नागरिकांनी केवळ पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी किंवा कारवाईच्या भीतीने हेल्मेटचा वापर करू नये, तर ते स्वतःच्या अमूल्य जीवाच्या रक्षणासाठी आहे, याची जाणीव ठेवावी. स्वतःचा जीव धोक्यात न घालता आजपासून घराबाहेर पडताना दुचाकीवरील दोघांनीही हेल्मेटचा नियमित वापर करावा.

प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news