गंगापूर : गंगापूर- भेंडाळा रस्त्यावर शासकीय महसूल बुडवून वाळूची चोरटी वाहतूक करणारा टाटा ४०७ टेम्पो गंगापूर पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत तीन लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९.२२ वाजण्याच्या सुमारास गंगापूर-भेंडाळा रस्त्यावरील अंजली पेट्रोलपंपासमोर (एमएच ०४ सीए ८११५) क्रमांकाचा टाटा ४०७ टेम्पो अपघातग्रस्त अवस्थेत आढळला. अपघातामुळे वाहनाची समोरील दोन्ही चाके बाजूला झाली होती, तसेच समोरील भागाचेही नुकसान झाले होते.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये सुमारे सहा हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू आढळली. पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो आणि सहा हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण तीन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.