Ganeshotsav: Idol prices set to rise by a whopping 25 to 30 percent
भाग्यश्री जगताप
छत्रपती संभाजीनगर : आवडता असणारा गणेशोत्सव अडीच महिन्यांवर आला आहे. सर्वत्र मूर्ती बनविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, डिझेलच्या वाढत्या किमती, पाणीटंचाई आणि पीओपीच्या दरवाढीमुळे मूर्तिकारांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्ती २५ ते ३० टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता मूर्तीकारांनी व्यक्त केली आहे.
यंदा आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करताना भाविकांना अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. कारण कच्च्या मालाच्या वाढत्या किमती व वाहतूक खर्च वाढल्याने बाप्पांच्या मूर्ती २५ टक्के महागणार आहेत. जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या खर्चामुळे मूर्तिकारांनी मूर्तीच्या किमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी पीओपी बॅग, रंग, सजावटीचे साहित्य आणि वाहतूक खर्चातही २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडले असून, ग्राहकांकडूनही दरवाढीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक कारखान्यांमध्ये गणेशमूर्ती साकारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कारागीर विविध आकारांच्या मूर्ती तयार करत आहेत. मात्र वाढत्या उत्पादन खर्चामुळे किमती स्थिर ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि लहान मूर्तीकडे नागरिकांचा कल वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
इंधन दरवाढीची झळ
वर्षभरात कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे कारागिरांना हा अतिरिक्त भार सोसणे कठीण होत आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतीमुळे कच्चा माल आणि तयार मूर्ती या दोन्हींच्या वाहतुकीचा खर्च जवळपास ५० टक्क्यांनी वाढल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.
यंदा गणपती मूर्तीच्या दरात सुमारे २५ ते ३० टक्क्यांची वाढ होऊ शकते. कारण वाहतुकीचा खर्च वाढल्याने रंगांच्या किमती, शाडू माती, पीओपीशिवाय मूर्ती सजावटसाठी लागणारे स्टोन, कपडा यातही वाढ झाली आहे.- मंगेश विष्णू छत्रे, मूर्तीकार.