

हिंगोली : सांगलीनंतर हिंगोली जिल्हा हळदीच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर मानल्या जातो. यंदा जिल्ह्यात तब्बल 50 हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली. परंतु, अतिवृष्टीमुळे हळदीच्या पिकावर कंदसड रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटले. एकीकडे उत्पादन घटले असताना दुसरीकडे हळद काढणीच्या मजुरीचे दर तब्बल 14 हजारांच्या घरात जाऊन पोहोचल्याने हळद उत्पादकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
मागील दहा वर्षापासून जिल्ह्यात हळदीची लागवड वाढत आहे. मागील तीन वर्षांपासून हळदीला समाधानकारक दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा ओढा हळदीच्या लागवडीकडे वाढला आहे. यंदा जवळपास 50 हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाल्याचा अंदाज आहे. मागील पंधरवड्यापासून हळदीची काढणी सुरू झाली आहे. परंतु, हळद काढणीसाठी मजुरांची प्रचंड टंचाई जाणवत आहे.
हळद काढणीसाठी एकरी 12 ते 14 हजार रुपये मोजावे लागत आहेत. एकीकडे मजुरीचे दर वाढले असताना दुसरीकडे उत्पादनातही घट होत असल्याचे उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा अतिवृष्टी झाल्याने हळदीच्या पिकावर कंदसड रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरासरी हळदीला 25 ते 30 क्विंटलचा प्रतिएकरचा उतारा येतो. यंदा मात्र तो उतारा घटल्याचे समोर आले आहे.
एकरी 20 ते 22 क्विंटलपर्यंत उतारा येत असल्याचे दिसून येते. सध्या हळदीला सरासरी 12 ते 15 हजार रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. त्यातच आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे हळदीची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे बाजारात हळदीचे दर गडगडले आहेत. अद्यापही युद्धावर तोडगा निघाला नसल्याने दर स्थिर आहेत. यंदा हळदीला किमान 15 ते 18 हजार रूपये प्रतिक्विंटलचा दर अपेक्षित होता. परंतु, युद्धामुळे हळदीच्या बाजारात मंदी दिसून येत आहे.
परजिल्ह्यातील मजूर कामावर
जिल्ह्यात मोठया प्रमाणात हळदीची लागवड झाल्याने स्थानिक मजुरांची टंचाई जाणवत आहे. परिणामी, इतर जिल्ह्यातील मजुरांना हळद काढणीसाठी आणावे लागत आहे. स्थानिक मजुरांपेक्षा परजिल्ह्यातील मजुरांसाठी अधिकची मजुरी मोजावे लागत असल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्च वाढला आहे.
शिजवणीसाठी अडचण
शेतशिवारात हळद काढणीची लगबग सुरू असतानाच मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. परिणामी हळद काढणी मंदावली आहे. ज्या शेतकऱ्यांनी हळद काढली आहे ते शेतकरी हळद कुकरच्या सहाय्याने शिजवण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. परंतु, ढगाळ वातावरणामुळे हळदीची शिजवणी ठप्प झाली आहे. दोन दिवसांत अवकाळी पाऊस थांबल्यानंतर हळदीच्या शिजवणीला वेग येणार आहे.