Mobile Hack : मोबाईल हॅक करून भामट्याचा उद्योजकाला १ कोटीचा गंडा file photo
छत्रपती संभाजीनगर

Mobile Hack : मोबाईल हॅक करून भामट्याचा उद्योजकाला १ कोटीचा गंडा

मालकाच्याच व्हॉट्सॲपवरून अकाउंटंटला मेसेज करत हडपले पैसे- सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे दोन तासांत पूर्ण रक्कम सुरक्षितरीत्या गोठवण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

Fraudster swindles entrepreneur out of ₹1 crore by hacking mobile phone

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: आरटीओ चालान भरण्याच्या नावाखाली 'एनव्हे बायोटेक प्रा. लि कंपनी'च्या मालकाच्या मोबाईलवर एक बनावट एपीके फाईल पाठवली. ती ओपन करताच मोबाईल हॅक झाला. त्या मालकाच्या व्हॉट्सअपवरून सायबर भामट्यांनी अकाउंटंटला एक कोटी रुपये पाठवण्याच्या सूचना करत रक्कम हडपली. हा प्रकार मंगळवारी (दि.४) दुपारी घडला. मात्र तक्रार मिळताच शहर सायबर पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत अवघ्या दोन तासांत गुन्हेगारांच्या खात्यातील संपूर्ण १ कोटी रुपये गोठवण्यात यश मिळवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एनव्हे बायोटेक प्रा. लि. या कंपनीच्या मालकाच्या व्हॉट्सअॅपवर मंगळवारी एका अज्ञात नंबरवरून आरटीओ चालान या नावाची एक एपीके फाईल आली होती. ही फाईल उघडताच त्यांचा मोबाईल सायबर गुन्हेगारांकडून हॅक झाला. मोबाईलचा ताबा मिळवल्यानंतर, गुन्हेगाराने मालकाच्याच व्हॉट्सअॅपवरून कंपनीतील अकाऊंटंटला मेसेज केला. या मेसेजमध्ये एका इंडसइंड बँकेच्या खात्यावर तात्काळ १ कोटी रुपये पाठवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

स्वतः मालकानेच मेसेज केला असल्याचा विश्वास वाटल्याने, अकाऊंटंटने कुठलीही शहानिशा न करता तात्काळ आरटीजीएसद्वारे १ कोटी रुपये नमूद बँक खात्यावर ट्रान्सफर केले.

जलद कारवाईमुळे गुन्हेगाराला पैसे काढता आले नाही

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच एनव्हे बायोटेक प्रा. लि कंपनीच्या अकाउंटंटने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. सायबर टीमने तात्काळ इंडसइंड बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गुन्हेगाराचे लखनौ (यूपी) येथील बँक खाते फ्रीज केले. तसेच या खात्यावरून इतर ज्या बँकांमध्ये पैसे वळवण्यात आले होते, ती सर्व खातीही तात्काळ गोठवण्यात आली.

या जलद कारवाईमुळे गुन्हेगाराला पैसे काढता आले नाही आणि फसवणूक झालेली संपूर्ण १ कोटीची रक्कम सुरक्षितरीत्या गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आले. तक्रारदाराला त्यांची रक्कम कायदेशीर प्रक्रियेद्वारे परत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, सपोनि कदीर देशमुख, उपनिरीक्षक गणेश गिरी, सुशांत शेळके, योगेश तळवंदे, सचिन संपकाळ, सोनाली वडनेरे, वैभव वाघचौरे, गोकुळ कुतरवाडे, राम काकडे, संदीप पाटील, माला सलामपुरे यांनी केली.

पुन्हा ४ कोटी मागितल अन् संशय आला

१ कोटी रुपये पाठवल्यानंतर थोड्याच वेळात त्याच नंबरवरून पुन्हा ४ कोटी रुपये पाठवण्यासाठी अकाऊंटंटला मेसेज आला. लागोपाठ एवढी मोठी रक्कम मागितल्याने अकाऊंटंटला संशय आला. त्याने तात्काळ कंपनीच्या मालकाला थेट कॉल करून विचारणा केली, तेव्हा आपण असा कोणताही मेसेज केला नसल्याचे मालकाने स्पष्ट केले. मालकाचा फोन हॅक झाल्याचे आणि आपली १ कोटीची मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अकाऊंटंटने क्षणाचाही विलंब न लावता थेट सायबर पोलिस स्टेशन गाठले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT