Fraud Case : धोंडे जेवायला आलेल्या जावयाचा सासूलाच गंडा; ४ लाख उकळले file photo
छत्रपती संभाजीनगर

Fraud Case : धोंडे जेवायला आलेल्या जावयाचा सासूलाच गंडा; ४ लाख उकळले

'धोंडे जेवणा'साठी घरी आलेल्या जावयाने सोन्याचे कडे बनवून देण्याच्या बहाण्याने सासूलाच लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Fraud Case: Son-in-law dupes mother-in-law; swindles ₹4 lakh

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा 'धोंडे जेवणा'साठी घरी आलेल्या जावयाने सोन्याचे कडे बनवून देण्याच्या बहाण्याने सासूलाच लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सोन्याच्या कड्याची ऑर्डर घेऊन सासूकडून तब्बल ४ लाख ३ हजार २६० रुपये उकळल्यानंतर जावयाने पोबारा केला. जावयाच्या आई-वडिलांनी यातील सव्वा लाख रुपये परत केले असले तरी, उर्वरित २ लाख ७८ हजार २६० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जावयाविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात (बुधवारी दि.३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोहम नितीन शहाणे (३०, रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे आरोपी जावयाचे नाव आहे. फिर्यादी सविता किशोर दहिवाळ (५०, रा. गाडेकर निवास, सुंदर नगर, नागेश्वरवाडी) यांच्या तक्रारीनुसार, त्या घरातूनच सोन्या-चांदीचे दुकान चालवतात. त्यांचा जावई सोहम शहाणे हा देखील सोन्याचे दागिने घडवण्याचे काम करतो.

सविता या नेहमी जावयाला दागिने बनविण्याच्या ऑर्डर देत होत्या. तो दागिने बनवून द्यायचा. १८ मे २०२६ रोजी सोहम आणि त्याची पत्नी (सविता यांची मुलगी) हे नागेश्वरवाडी येथे 'धोंडे जेवणासाठी' आले होते. त्याचवेळी विशाल राजपूत नावाचा एक ग्राहक सविता यांच्याकडे आला आणि त्याने अडीच तोळ्यांचे सोन्याचे कडे बनवण्याची ऑर्डर देऊन १ लाख रुपये अॅडव्हान्स दिले. सविता यांनी ही ऑर्डर जावई सोहम याला दिली व कडे बनवण्याचा व्यवहार ४ लाख ३ हजार २६० रुपयांत ठरला.

सविता यांचा मुलगा शुभम याने सोहमला त्याच दिवशी फोन पे द्वारे १ लाख रुपये पाठवले. त्यानंतर २० मे ते ६ जून या काळात सोहमने आणखी पैशांची मागणी केली. सासू आणि मेव्हण्याने विश्वासाने सोहमच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने एकूण ४ लाख ३ हजार २६० रुपये ऑनलाईन पाठवले.

मात्र, पूर्ण पैसे मिळाल्यानंतर सोहमने ऑर्डर देण्यास टाळाटाळ सुरू केली. १७ जून रोजी तो पुन्हा आला आणि उद्या सकाळी ऑर्डर पोहोचेल असे सांगून निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा फोन बंद येऊ लागल्याने दहिवाळ कुटुंबाने संबंधित व्यापाऱ्याकडे चौकशी केली असता, सोहमने अशी कोणतीही ऑर्डर किंवा पैसे दिले नसल्याचे उघड झाले.

आई-वडिलांनी परत केले सव्वा लाख

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सविता यांनी सोहमच्या आई-वडिलांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी सोहम तुमच्याकडे आल्यानंतर पुन्हा घरी आलाच नसल्याचे सांगितले. त्यानंतर जुलै महिन्यात सोहमच्या आई वडिलांनी मिळून १ लाख २५ हजार रुपये दहिवाळ कुटुंबाला परत केले. मात्र, उर्वरित २ लाख ७८ हजार २६० रुपये देण्यास असमर्थता दर्शविली. अखेर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर सविता यांनी दिलेल्या तक्रारीवरून जावई सोहम विरुद्ध क्रांती चौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात झाला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक उत्तम जाधव हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT