For the second consecutive day, unseasonal rains lashed the city and its surrounding areas
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहर व परिसरात बुधवारी (दि.१८) रात्री कोसळलेल्या अवकाळी पावसानंतर सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.१९) शहरासह परिसराला जोरदार पावसाने झोडपले. दिवसभर ढगाळ वातावरण, त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह धुवांधार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला.
शहराच्या तापमानाने ४० अंशांचा टप्पा गाठला. त्यानंतर बुधवारी रात्री अचानक शहर व परिसरात गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी गुरुव ारीही शहर व परिसरात हजेरी लावली.
दिवसभर आकाश ढगांनी व्यापलेले होते. सूर्यदर्शन होत नसल्याने उष्णतेत घट झाली होती, मात्र संध्याकाळनंतर वातावरणात अचानक बदल झाला. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शहर व परिसरात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरातील चिकलठाणा, सिडको, हडको, लेबर कॉलनी, ज्युबली पार्क, जालना रोड, औरंगपुरा, भावसिंगपुरा, छावणी, सातारा, देवळाई, शिवाजीनगर, पुंडलिकनगर, उस्मानपुरा व क्रांती चौक अशा सर्वच भागांत विजेच्या कडकडाटासह धुवांधार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धांदल उडाली. पावसाच्या या सरींमुळे शहरातील काही सखल भागांत पाणी साचले.
तसेच रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. हवामानातील या बदलामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली असून, वातावरणात गारवा जाणवत आहे. मात्र, सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकरीवर्गात चिंता व्यक्त होत आहे. काढणीच्या हंगामात पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या वादळी पावसामुळे शहरात वातावरणात गारवा आला असला तरी जनजीवनावर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले.
आणखी दोन दिवस पाऊस
हवामान विभागाने पुढील एक-दोन दिवस अशाच ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्यावर न थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरासह परिसराला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले असून, जिल्ह्यातील फुलंब्रीसह काही गावांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी काहीप्रमाणात गारा पडल्या. त्यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा पिके आडवी पाडली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, रब्बी हगांमातील पिकांचे अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
लाईट गुल
शहरात रात्री साडेनऊच्या सुमारास पावसाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच विविध भागातील लाईट गुल झाली. त्यामुळे एकीकडे पावसाने हैराण झालेल्या नागरिकांना बत्ती गुल झाल्याने रात्र अंधारात काढावी लागली.
सिडको एन-१ मध्ये झाडाला आग
रात्री अचानक पावसाला सुरूवात होताच ढगांचा गडगटात वादळी वारा वाहण्यास सुरूवात झाली. या वादळी वाऱ्यामुळे सिडको एन-१ भागातील महावितरणच्या अति उच्च दाबाच्या विद्युत तारांचे एकमेकांना घर्षणाने झाडाला आग लागली. अग्निशमन दलाला घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, अग्निशमन दल पोहचण्यापूवीच नगरसेविका सुरेखा सानप याचे चिरंजीव विशाल सानप यांच्यासह परिसरातील नागरिकांनी धाव घेत झाडाला लागलेली आग विझवली.
पुढील तीन तासांत पावसाचा संदेश
पुढील ३ तासांत आपल्या जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असा संदेश प्रत्येकाच्या मोबाईलला येत होता. राज्य आपत्कालीन कार्य संचालन केंद्र, मंत्रालय, मुंबईकडून देण्यात येणाऱ्या सतर्कतेच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात काळजीचे वातावरण पहायला मिळाले. विशेषतः बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले.