Food Adulteration Drive pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Adulteration in food : साहेब, तो खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करतो, कारवाई करा...

अन्न प्रशासनाकडे महिन्याभरात शंभराहून अधिक आल्या तक्रारी

पुढारी वृत्तसेवा

Food administration receives over a hundred complaints in a month

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा अन्न व औषधी प्रशासनाकडून कधी नव्हे ते भेसळ रोखण्यासाठी कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या तक्रारींचा ओघही वाढला आहे. येथील विभागाकडे जिथे महिन्याला तीन ते चार अर्ज यायचे. तिथे रोज ४ हून अधिक तक्रारी येत असून, मागील तीस दिवसांत तब्बल शंभराहून अधिक तक्रारी आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे आल्यापासून जवळपास सर्वच जिल्ह्यात भेसळ रोखण्यासाठी कारवाया सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सुरुवातीच्या अवघ्या १० दिवसांतच प्रतिबंधित पानमसाला, गुटखा, पेयजल, तेल, तुपासह संशयित विविध खाद्यपदार्थांचा तब्बल अडीच कोटीहून अधिकची कारवाई केली होती. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

विभागाकडून हेल्पलाईन नंबरही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यासह येथील जिल्हा कार्यालयाकडे फोन, व्हॉट्सअप, कार्यालयावर प्रत्यक्ष भेटून वा अर्जाव्दारे किंवा ईमेलवरही भेसळ करणाऱ्यांविरोधात तक्रारी येत आहेत. हेल्पलाईन नंबरवर येणाऱ्या तक्रारी वगळता विभागाकडे रोज ४ ते ५ तक्रारी येत आहेत. त्या तक्रारींची शाहनिशा करून कारवाई केली जात आहे. काही खोट्या तक्रारी येत असल्याचे अधिकारी म्हणाले.

सर्वाधिक तक्रारी हॉटेल्स, रेस्टॉरंटविरोधात

अन्न प्रशासनाकडे येणाऱ्या तक्रारींपैकी निम्याहून अधिक तक्रारी या विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई यांच्या विरोधात येत आहेत. विविध खाद्यपदार्थांमध्ये भेसळ, त्यांची गुणवत्ता यांसह रस्त्यावरील टपरी, वडापाव, समोसा विक्रेत्यांकडील अस्वच्छता, तेलाचा पुन्हा-पुन्हा वापर अशा आशयाच्या तक्रारी येत आहेत.

या तक्रारींचाही समावेश

टपरी-किराणा दुकानांवर गुटखा विक्री, दुधात पाणी मिसळणे, खवा व पनीरमध्ये भेसळ, महागड्या खाद्यतेलात पामतेल किंवा निकृष्ट दर्जाचे तेल मिसळणे, मसाले, खराब अन्नपदार्थ, फळे तसेच उघड्यावरील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारींचाही समावेश आहे.

आलेल्या तक्रारींवर कारवाई भेसळीबाबत आधी महिन्याला ३ ते ४ तक्रारी येत. आता याचा ओघ अनेक पटीने वाढला आहे. मागील महिन्याभरात शंभराहून अधिक तक्रारी आल्या आहेत. कोणी फोनवर, व्हॉटसअॅपव्दारे, प्रत्यक्ष भेटून आणि थेट अर्जाव्दारे कारवाईची मागणी करतात. त्यानुसार कारवाई केली जाते. काही तक्रारी विनाकारण केलेल्या असल्याचे निष्पन्न होते.
डी. व्ही. पाटील सहाय्यक आयुक्त, अन्न प्रशासन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT