Sambhajinagar News : हर्सूल जेलमध्ये पाच कैद्यांचा तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : हर्सूल जेलमध्ये पाच कैद्यांचा तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला

हर्सुल कारागृहात यार्डमध्ये राउंड घेत असताना बॅरेक २ मध्ये संशयास्पदरीत्या आढळून आलेल्या ५ कैद्यांचा राडा

पुढारी वृत्तसेवा

Five prisoners attack prison officer in Harsul Jail

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हर्सुल कारागृहात यार्डमध्ये राउंड घेत असताना बॅरेक २ मध्ये संशयास्पदरीत्या आढळून आलेल्या पाच कैद्यांनी चांगलाच राडा केला. तुरुंग अधिकाऱ्यासह पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करत शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.७) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

न्यायाधीन बंदी रितेश ऊर्फ विक्की भगवान पुसे, पवन ईश्वरलाल जैस्वाल, विनोद सुभाष शिंदे, शिक्षाबंधी आनंद सुरेश लोखंडे आणि स्थानबद्ध बंदी ओम दादाराव म्हस्के अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी योगेश कौतिक शिंदे (३५) हे हर्मूल कारागृहात तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, पाचही कैदी सर्कल १६ विभागातील वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवलेले आहेत.

रविवारी दुपारी दीडच्या सुमारास शिंदे व त्यांच्यासोबतच पोलिस कर्मचारी हे राउंड घेत असताना त्यांना बॅरेक २ मध्ये सर्वजण एकत्र संशियितरीत्या आढळून आले. त्यांची झडती घेतली तेव्हा आरोपी रितेश पुसेकडे धारदार पत्र्याचा तुकडा आढळून आला. त्याला विचारपूस करत असताना पाचही बंदी आरोपींनी शिंदेसह पोलिसांशी वाद घातला. रितेश पुसेने तुरुंग अधिकारी शिंदे यांच्यावर हल्ला करून शर्टची कॉलर पकडून अंगावर धावून आला. तेवढ्यात इतर चार आरोपींनीही शिंदेंसह पोलिसांवर धावून येत आरडाओरड शिवीगाळ करू लागले. पोलिस कर्मचाऱ्याने शिट्टी वाजवून धोक्याचा इशारा केल्याने अन्य अधिकारी-कर्मचारी धावून आले. मात्र पाचही आरोपींनी आक्रमक होऊन शिंदे याना मारहाण सुरू केली. तेव्हा पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती आटोक्यात आणली.

कोणत्या गुन्ह्यातील आरोपी

कुख्यात पवन जैस्वालने काही दिवसांपूर्वीच सीआयडीच्या अधिकाऱ्याच्या वाहनावर हल्ला करून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.

अयोध्यानगर येथे चौघांनी अमोल घुगे याची निघृण हत्या केली होती. त्या गुन्ह्यातील रितेश ऊर्फ विक्की भगवान पुसे हा आरोपी आहे.

बीड बायपासवर पुणे येथील ठेकेदाराचे पिस्तूलचा धाक दाखवत १९ जूनला अपहरण करून लुटल्याच्या गुन्ह्यात विनोद सुभाष शिंदे आरोपी आहे. त्याच्यासह तिघांना गुन्हे शाखेने अटक केली होती.

आनंद सुरेश लोखंडे याने २०१९ साली रांजणगाव शेणपुंजी येथे पत्नीचा गळा आवळून खून केला होता. त्याप्रकरणी तो शिक्षा भोगत आहे.

ओम म्हस्के हा सराईत गुन्हेगार असून, त्याला हर्सल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

एकाच बॅरेकमध्ये आले कसे ?

पवन जैस्वाल, आनंद लोखंडे आणि विनोद शिंदे हे बंदी वेगवेगळ्या बॅरेकमध्ये ठेवलेले असताना ते तिघे बॅरेक २ मध्ये विनापरवानगी बसलेले आढळून आले. त्यामुळे हे पाच जण एकाच बॅरेकमध्ये आले कसे? कारागृहाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT