Crime News : बौद्ध लेणी परिसरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासह पाच जणांवर टोळक्याचा हल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : बौद्ध लेणी परिसरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासह पाच जणांवर टोळक्याचा हल्ला

धक्का लागल्यावरून वाद; डोक्यात रॉड मारल्याने विद्यार्थी गंभीर जखमी; बेगमपुरा पोलिसांत ६ जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Five people including an engineering student were attacked by a gang in Buddh Leni area

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा बौद्ध लेणी परिसरात डोंगरावर फिरताना एकाला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद मिटवूनही नंतर टोळक्याने इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासह पाच जणांवर लोखंडी रॉडने हल्ला करून बेदम मारहाण केली. ही घटना वन-ट्री बौद्ध लेणी परिसरात रविवारी (दि.२६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचे डोके फुटून त्याला टाका घालावा लागला आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात बुलेटस्वारासह त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी त्रिशुल अनिल पठारे (२१, रा. ढिबरगल्ली, बेगमपुरा) याच्या तक्रारीनुसार, तो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतो. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याचे मित्र दर्शन राजू थोरात, पीयूष कडुबा लहिरे, आदित्य सुनील बिरोटे आणि एका १५ वर्षीय अल्पवयीन मित्रासोबत वन-ट्री बौद्ध लेणीकडे फिरायला जात होता. डोंगरावर अर्ध्या रस्त्यात असताना सोबचच्या १५ वर्षीय मित्राचा एका अनोळखी मुलाला चुकून धक्का लागला. याचा राग येऊन त्या मुलाने शिवीगाळ केली. यावेळी त्रिशुल आणि त्याच्या मित्रांनी मध्यस्थी करून समजुतीने वाद मिटवला आणि ते डोंगरावर पुढे फिरायला निघून गेले.

डोंगर फिरून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्रिशुल आणि त्याचे मित्र खाली बौद्ध लेणीजवळ आले. मात्र तिथे बुलेटवर (एमएच २० बीडी ०११३) आलेला एक जण आणि त्याचे इतर ५ साथीदार तिथे थांबलेले होते. त्रिशुल तिथे पोहोचताच बुलेटस्वाराने त्याच्या हातातील रॉडने थेट त्रिशुलच्या डोक्यात, हातांवर व पायावर मारहाण केली.

डोक्यात जोरदार फटका बसल्याने त्रिशुलच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. आरोपीने त्रिशुलचे मित्र दर्शन, पीयूष, आदित्य आणि त्यांच्या १५ वर्षीय मित्रालाही त्याच रॉडने मारहाण केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या इतर पाच अनोळखी तरुणांनी या सर्वांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पुढील तपास उपनिरीक्षक गोमटे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT