Five lakh rupees stolen from a merchant's car in Ajanta after smashing the window
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा हॉटेलवर जेवणासाठी थांबलेल्या भुसार व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लांबवली. ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी तीनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंचखेड्याजवळील हॉटेल अजिंठा येथे घडली.
चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, चोरट्यांनी बँकेपासून व्यापाऱ्याचा पाठलाग केल्याचा संशय आहे. भारत विठ्ठल तायडे (वय ३४, रा. अंधारी, ता. सिल्लोड) हे भुसार मालाचे व्यापारी आहेत. त्यांनी शनिवारी दुपारी सिल्लोड शहरातील एसबीआय बँकेतून पाच लाख रुपये काढले.
दोन मित्रांसोबत कारने (एमएच-०२, सीआर-२५७४) अंधारीकडे जात असताना ते चिंचखेड्याजवळील हॉटेल अजिंठा येथे जेवणासाठी थांबले. यावेळी पैशांची बॅग कारच्या मागील सीटवरच राहिली. तायडे व त्यांचे मित्र हात धुण्यासाठी गेले आणि टेबलवर बसल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी कारची काच फोडून बॅग लांबवली होती.
कारजवळ गेल्यानंतर काच फुटलेली आणि बॅग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच वडोदबाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, पोलिस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर व बीट जमादार धनराज खाकरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या प्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर करीत आहेत.
तिघे सीसीटीव्हीत कैद
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दुचाकींवरून तिघे चोरटे आल्याचे दिसून आले. एका दुचाकीवरील दोघांपैकी एक जण खाली उतरून कारजवळ थांबला. व्यापारी व त्यांचे मित्र हात धुण्यासाठी जाताच त्याने कारची काच फोडून बॅग काढली. त्यानंतर तिघेही दुचाकींवरून पसार झाले.